कामा रुग्णालयातील डॉक्टरांचे गर्भाशयाच्या कर्करोगासंदर्भात संशोधन

कर्करोगग्रस्तांसाठी केमोथेरपी लाभदायक ठरते. मात्र शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाला केमोथेरपी दिल्यास शस्त्रक्रियेदरम्यान संपूर्ण कर्करोग काढून टाकणे शक्य होत असल्याचा निष्कर्ष कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनातून निघाला आहे. गर्भाशायाचा कर्करोग झालेल्या रुग्णांवर या पद्धतीने उपचार केल्याने त्यांच्यातील कर्करोग पूर्णपणे बरा झाला असल्याचे कामा रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले.कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी केमोथेरपी ही उपचार पद्धती महत्त्वपूर्ण समजली जाते. कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात गर्भाशयातील कर्करोगासाठी शस्त्रक्रियेपेक्षा केमोथेरपी फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गर्भशयाचा कर्करोग हा धोकादायक समजला जातो. या कर्करोगाची लक्षणे पटकन दिसून येत नाहीत, तसेच अनेक ठिकाणी त्याच्या तपासणीसाठी आवश्यक यंत्रणाही उपलब्ध नाही. त्यामुळे या कर्करोगाची लागण झाल्याचे उशीरा लक्षात येते. कामा रुग्णालातील डॉ. सकिना यू, डॉ. सोहेल शेख आणि डॉ. तुषार पालवे यांनी गर्भाशयातील अंडाशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांवर २०१८ ते २०२२ दरम्यान अभ्यास केला. कामा रुग्णालयामध्ये येणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. डॉक्टरांनी अभ्यासलेल्या रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांमध्ये प्रगत अवस्थेतील गर्भाशयाचा कर्करोग आढळून आला. यात ग्रामीण भागातील ५३ टक्के तर शहरी भागातील ४७ टक्के महिलांचा समावेश होता. या सर्व महिला रुग्णांचे सरासरी वय हे ५६ वर्ष इतके होते. त्यातील सुमारे १० टक्के रुग्णांना कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास होता. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलांना साधारणपणे ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, वजन कमी होणे, भूक न लागणे आणि रक्तस्त्राव होणे अशा सामान्य तक्रारी होत्या. मात्र या महिलांची कर्करोगाची चाचणी केल्यानंतर बहुतांश महिलांना गर्भाशायाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचे आढळून आले.

हेही वाचा >>>मुंबई: वैद्यकीय विभागाच्या उपक्रमांचा आता समाजमाध्यमांवर प्रचार

कर्करोगग्रस्त महिलांपैकी २७ महिलांना शस्त्रक्रियेपूर्वी केमोथेरपीच्या 4 फेऱ्या देण्यात आल्या. तर १८ महिला रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपी देण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी केमोथेरपी घेतलेल्या रूग्णांमध्ये (एनएसीटी-आयडीएस) १०० टक्के रक्त कमी झाल्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान संपूर्ण कर्करोग काढून टाकणे शक्य झाले. मात्र ज्या रूग्णांमध्ये प्रथम शस्त्रक्रिया करण्यात आली (पीडीएस-एसीटी) त्यांच्यातील केवळ ८८ टक्के रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान संपूर्ण कर्करोग काढून टाकण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या शरीरातील सरासरी रक्त कमी होऊन गुंतागुंत वाढली होती. त्यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेपूर्वी केमोथेरपी दिल्याने संपूर्ण कर्करोग काढून टाकणे शक्य असून, ती उपचार पद्धती महिलांसाठी योग्य असल्याचे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय निरिक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“…म्हणून मी नाशिकच्या शेतकऱ्यांना माझ्याकडे का येता असा प्रश्न विचारला”, राज ठाकरेंनी सांगितलं कारण

ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक

ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोगाबाबत जनजागृती नसते. ग्रामीण भागात तपासणी करण्याची कोणतीही सुविधा केंद्रांमध्ये नसल्याने महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होण्यास विलंब होत असल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Research on uterine cancer by doctors at cama hospital mumbai print news amy
Show comments