एकेकाळी देशाची गरज लक्षात घेऊन उत्तम अभियंते घडविणारी संस्था म्हणून ‘आयआयटी’-मुंबई प्रसिद्ध होती. त्यानंतर काळाची गरज ओळखून संशोधनक्षेत्रात आयआयटीचे अध्यापक व विद्यार्थी उतरले आणि आता आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी परदेशात न जाता भारतातच राहून उद्योजक म्हणून काम करण्यास प्राधान्य दिले आहे. उच्च विद्याविभूषित विद्यार्थ्यांना यासाठी संशोधन व उद्योगजगताची सांगड घालता यावी आणि स्वतंत्र संशोधन करता यावे यासाठी जवळपास अडीच लाख चौरस फूट जागेवर आयआयटी मुंबई पहिल्या टप्प्यातील ‘रिसर्च पार्क’ उभे करणार आहे.

आयाआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांची क्षमता सुमारे दहा हजार एवढी असून पदवीपेक्षा पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. यातही जवळपास अडीच हजार विद्यार्थी हे पीएचडी करत असून दर वर्षी सुमारे पावणेतीनशे जण पीएचडी प्राप्त करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्ट अप इंडिया’ घोषित करण्याच्या किती तरी अगोदर आयआयटी मुंबईने नवउद्यमांची गरज लक्षात घेऊन काही योजना हाती घेतल्या होत्या. यासाठी अर्थात मोठय़ा प्रमाणात संशोधनाची व उद्योगांची सांगड घालणे आवश्यक होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही गरज ओळखून संशोधनासाठी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये देशभरातील आयआयटी, एनआयटी, व्हीजेटीआय आदी १७१ तंत्रशिक्षण संस्थांना उपलब्ध करून दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर आयआयटीमधील रेनेसन्स हॉटेलच्या बाजूला असलेल्या जागेत हे ‘रिसर्च पार्क’ उभे राहणार आहे.

पार्कमध्ये मोठमोठय़ा कंपन्या संशोधन प्रयोगशाळा उभारून देणार असून आयआयटीचे विद्यार्थी व प्राध्यापक आणि उद्योजक यांच्या समन्वयातून नवउद्यमाची लाट उभी राहील असा विश्वास येथील प्राध्यापकांनी व्यक्त केला.  ‘रिसर्च पार्क’चा पहिला टप्पा २०२३ पर्यंत पूर्ण होणार असून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात एकूण १० लाख चौरस फूट बांधकाम उभे राहणार आहे.

देशविदेशातील कंपन्यांना येथे जागा देण्यात येणार असून त्यांना आवश्यक असलेले संशोधन करून दर्जेदार उत्पादननिर्मिती केली जाणार आहे. यातून मोठय़ा प्रमाणात आयआयटीतील विद्यार्थ्यांमधील उद्योजगतेला वाव मिळणार आहे.

उद्योगविश्व विस्तारणार

एकीकडे ‘साइन’च्या माध्यमातून आयआयटीमधील ज्यांना व्यवसायात शिरायचे आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना गेली काही वर्षे राबविल्या जात आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे हे ‘रिसर्च पार्क’ आहे. ज्ञान, संशोधन यांची व्यावसायिकतेशी सांगड घालणारे ‘रिसर्च पार्क’ आगामी काळात ‘ब्रेन ड्रेन’ थांबवून भारताच्या उद्योगविश्वाचा मोठय़ा प्रमाणात विस्तार करेल असा विश्वासही येथील ज्येष्ठ प्राध्यापकांनी व्यक्त केला.

Story img Loader