मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरातील मुलुंड येथे लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार असून त्याकरिता आरक्षण बदलाच्या प्रस्तावास नुकतीच राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुलुंडच्या या नियोजित उद्यानात १८ दुर्मीळ प्रजातींसह २०६ प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार असून या पक्षी उद्यानाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुलुंड पश्चिमेकडे नाहूर गाव परिसरात सीटीएस क्रमांक ७०६ हा भूखंड पालिकेने उद्यान व वाहनतळ या उद्देशासाठी आरक्षित आहे. या आरक्षित भूखंडाचा विकास करण्यात येणार असून तेथे सर्व सुविधांनी युक्त असे उद्यान तयार करण्यात येणार आहे. तसेच उद्यानात पक्षीगृह तयार करण्यात येणार आहे.मुंबई प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांनी जानेवारी २०२४ मध्ये नाहूर भूखंडाचे आरक्षण बदलण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. महापालिकेने त्यावर सूचना हरकतींची प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पूर्ण केली. जानेवारी २०२५ मध्ये नगरविकास विभागाला प्रस्ताव सादर केला. नगर विकास विभागाने मुंबई महापालिकेने पाठवलेल्या प्रस्तावास नुकतीच मंजुरी मिळाली. असल्याची माहिती मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी दिली.

नगररचना संचालकांनी फेब्रुवारीमध्ये यासंदर्भातला अहवाल दिला असून ७ एप्रिल रोजी नगरविकास विभागाने भूखंडाच्या आरक्षण फेरबदल्यास मंजुरी दिल्याची अधिसूचना जारी केली आहे, असे आमदार कोटेचा यांनी सांगितले.नाहूर येथील सीटी सर्वे क्रमांक ७०६, ७१०, ७१२, ७६२, ७६३ या उद्यान व प्राणीसंग्रहालयासाठी राखीव असलेल्या भूखंडातील १७९५८ चौ. मी. क्षेत्रफळ पक्षी उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. प्रस्तावित मुलुंड पक्षी उद्यान हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे (भायखळा) उपकेंद्र असणार आहे.

या पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी पक्षांची विभागणी असणार आहे. प्रत्येक पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. रेड ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकीट, पांढरा मोर, मलबार ग्रे धनेश, काळा हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, शहामृग, स्कॉलेट या काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या दुर्मीळ १८ प्रजातींचे २०६ पक्षी येथे पाहता येणार आहेत.

आमदार मिहीर कोटेचा पुढे म्हणाले, ११० वर्षांपूर्वी साकारण्यात आलेल्या भायखळा येथील प्राणिसंग्रहालयानंतर मुलुंडमधील पक्षी उद्यान हे एमएमआर क्षेत्रातील पर्यटकांचे आकर्षण असेल. मुंबईच्या उपनगर भागात आणि एमएमआर प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना कमी प्रवासाच्या अंतरात या पक्षी उद्यानाला भेट देणे शक्य आहे. पक्षी प्रेमींसाठी ही एक पर्वणी असेल. कुटुंब, नातेवाईक, विद्यार्थी आणि नागरिकांना मुलुंड पक्षी उद्यानात अनोखा अनुभव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.