कोकण रेल्वेच्या गणेशोत्सवादरम्यान सुटणाऱ्या नैमित्तिक गाडय़ा १५ मिनिटांत फुल्ल झाल्यानंतर आता विशेष गाडय़ांचे आरक्षणही काही मिनिटांतच फुल्ल झाले आहे. आता मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची भिस्त मध्य रेल्वे यंदा पहिल्यांदाच सोडत असलेल्या अनारक्षित गाडय़ांवर आहे. या गाडय़ांच्या एकूण ५४ फेऱ्या गणपतीच्या दिवसांत धावणार आहेत. या सर्व विशेष फेऱ्यांची तिकिटे एकाच दिवशी विक्रीला काढण्याच्या मध्य रेल्वेच्या निर्णयावर मात्र अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
गणपतीसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य रेल्वेने विशेष गाडय़ा सोडण्याची घोषणा केली. या गाडय़ांचे आरक्षण बुधवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार होते. मध्य रेल्वे यंदा सात विशेष गाडय़ांच्या एकूण १२० जादा फेऱ्या चालवणार आहे. त्यापैकी दोन गाडय़ा अनारक्षित असल्याने उर्वरित पाच गाडय़ांच्या ६६ फेऱ्यांसाठी बुधवारी आरक्षण सुरू झाले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आदी सर्वच शहरांतून हजारो खिडक्यांवर आणि हजारो संगणकांवर एकाच वेळी चाकरमान्यांनी झुंबड केली.
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीपर्यंतच्या गाडय़ांना जास्त मागणी असते. प्रत्येकाला घरी पहिल्या दिवशी पोहोचायचे असते. त्यामुळे ४ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीतील गाडय़ा लगेचच भरल्याचे नेहमी कोकणात जाणाऱ्या पांडुरंग गावडे यांनी सांगितले. सध्या या गाडय़ांची प्रतीक्षा यादी दोनशेच्या वर गेल्याचेही ते म्हणाले.
कोकणात जाताना आरक्षण असले, तर किमान बसण्याच्या जागेची निश्चिंती होते. नाहीतर आता अनारक्षित गाडय़ांमध्ये जागा पटकावण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागणारच आहे, असे काही प्रवाशांनी सांगितले. मध्य रेल्वे या विशेष गाडय़ांना काही डबे आणखी जोडून प्रतीक्षा यादीत असलेल्या काहींची आरक्षणे निकालात काढण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा