ज्येष्ठ नागरिकांसाठी उपनगरी गाडीत १४ आसने ही केवळ त्यांच्यासाठीच असली पाहिजेत, असे बजावत इतर प्रवाशांचे त्यावर अतिक्रमण होणार नाही यासाठी या १४ जागा कुठल्या डब्यात ठेवायच्या की त्यासाठी वेगळी व्यवस्था करायची याचा निर्णय रेल्वेने तातडीने घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.
ज्येष्ठांसाठी सोय करताना अपंग आणि महिलांच्या जागांवर गंडांतर आणू नका, असेही न्या. अभय ओक आणि न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने बजावले असून आदेशाच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासनाला १५ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे.
मुंबईतील उपनगरी गाडय़ांतील गर्दी पाहता ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यासाठी आरक्षित जागांवर बसणे तर दूरच, गाडीमध्ये चढणेही कठीण असते. त्यामुळेच अपंगांच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्वतंत्र डबा करण्याची मागणी करणारे पत्र ए. बी. ठक्कर या ज्येष्ठ नागरिकाने न्यायालयाला लिहिले होते. न्यायालयाने या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर केले आहे.