मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वसाहतींतील मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित असलेले सार्वजनिक रस्ते पालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. हे रस्ते ‘जैसे थे’ स्थितीत हस्तांतरित केले जाणार आहेत.
मुंबईत म्हाडाच्या एकूण ११४ वसाहती असून या वसाहतींत सार्वजनिक रस्ते आहेत. या रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती, विकास याची जबाबदारी मुंबई मंडळाची आहे. पण आता मात्र मुंबई मंडळाच्या वसाहतीतींल सार्वजनिक रस्ते पालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी म्हाडा मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. त्यानुसार हे रस्ते ‘जैसे थे’ स्थितीत पालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. या वसाहतींत अतिक्रमण झालेले वा अतिक्रमण न झालेल्या अशा सर्व आरक्षित रस्त्यांचा यात समावेश आहे.
हेही वाचा >>>जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरण : आरोपी चेतन सिंह मानसिक आजाराने ग्रस्त, अकोला
देखभाल, दुरुस्ती प्रभावीपणे होण्यास मदत
रस्ते हस्तांतरित केल्याने रस्ते विकास, रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. पालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित असलेले सार्वजनिक रस्ते पालिकेकडे वर्ग केले जाणार आहेत. जयस्वाल यांच्या निर्णयानुसार मुंबई मंडळातील सर्व संबंधित कार्यकारी अभियंता व मिळकत व्यवस्थापकांना रस्ते वर्ग करण्यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.