मुंबई : राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्पांत फेब्रुवारीअखेर एकूण पाणी साठवण क्षमतेच्या ५८.६८ टक्के पाणीसाठा आहे. गत दहा वर्षांत फेब्रुवारीअखेर सरासरी ४६.९९ टक्के पाणीसाठा असतो, यंदा सरासरीच्या ११.६९ टक्के जास्त पाणीसाठा आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात पिण्यासाठी, जनावरांसाठी, उद्योग आणि शेतीसाठी पाण्याला मागणी वाढते. मार्च, एप्रिल, मे आणि गत काही वर्षांपासून मोसमी पाऊस उशिराने सक्रीय होत असल्यामुळे जूनअखेर धरणांतील पाण्याला मागणी असते. गत दहा वर्षांत फेब्रुवारीअखेर राज्यातील धरणांत ४६.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहत होता. यंदा ५८.६८ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे, म्हणजे राज्यातील सर्व धरण प्रकल्पांत २३७६६.२८ दलघमी उपयुक्त आणि ३१५०३.१४ दलघमी एकूण पाणीसाठा आहे.

 मराठवाडा विभागाला यंदा मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरी २५.२७ टक्के पाणीसाठा असतो, यंदा ५६.३९ टक्के पाणी शिल्लक आहे. सरासरीपेक्षा ३१.१२ टक्के जास्त पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ४०९४.३७ दलघमी उपयुक्त आणि ५९९९.४६ एकूण पाणीसाठा आहे. उन्हाळ्यात मराठवाड्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. प्रामुख्याने उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात टंचाई अधिक तीव्र असते, यंदा मुबलक पाणीसाठा असल्यामुळे मराठवाड्यासाठी उन्हाळा काहीसा सुसह्य असेल.

दमदार पावसाळ्यामुळे धरणे तुडूंब

राज्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा २६ टक्के जास्त पर्जन्यवृष्टी झाली होती. पावसाळ्यात सरासरी ९९४.५ मिलीमीटर पाऊस पडतो, यंदा १२५२.१ मिमी पाऊस पडला होता. त्यामुळे राज्यातील सर्वच विभागातील धरणे जुलैमध्येच भरली होती. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही तुरळक पाऊस पडत राहिला. त्यामुळे धरणांत पाण्याची आवक ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू राहिली. त्यामुळे फेब्रुवारीअखेर राज्यातील धरणांमध्ये ५८.८६ टक्के पाणीसाठा आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई फार जाणविणार नाही.

विभागनिहाय पाणीसाठा, कंसात सरासरी पाणीसाठा (टक्क्यांत)

नागपूर – ५३.१२ (५५.१६), अमरावती – ६१.९२ (५८.२४), छत्रपती संभाजीनगर ५६.३९ (२५.२७), नाशिक – ५९.१४ (४८.९९), पुणे – ५९.५० (४७.९०), कोकण – ६२.६९ (६१.०१).

पाणी आहे, नियोजन नाही

यंदा राज्यातील धरणांत सरासरीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा आहे. मराठवाड्यातही पाणीसाठा चांगला आहे. या पाण्याचे चांगले नियोजन करण्याची गरज आहे. पाणी आहे, पण नियोजन नाही, अशी स्थिती मराठवाड्यात आहे. एक हेक्टर उसाला लागणाऱ्या पाण्यात १७ एकर क्षेत्रातील अन्य पिके घेता येतात. पाण्याचा तुटवडा असूनही मराठवाड्यात उसाची लागवड केली जाते. या अविवेकी पीक पद्धतीमध्ये राजकीय नेत्यांचा स्वार्थ आहे, असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता रवींद्र पाठक यांनी व्यक्त केले.

Story img Loader