जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनाला राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने पाठिंबा दिला आहे. सलग तिसऱ्या दिवशी निवासी डॉक्टरांनी ‘मास बंक’ सुरूच ठेवला. जे.जे.चे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व नेत्ररोगचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्याकडून अन्याय होत असल्याची तक्रार निवासी डॉक्टरांनी केली तर कारवाईच्या भीतीने काही निवासी डॉक्टरांनी असे पाऊल उचलल्याचे अधिष्ठाता डॉ. लहाने यांचे म्हणणे आहे.
दरम्यान जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
नेत्ररोगचिकित्सा विभागातील प्रमुखांकडून शस्त्रक्रियेसंबंधी कोणतीही संधी दिली जात नाही तसेच दिवसाचे १४ ते १५ तास कोणताही ब्रेक न घेता परिचारिका व शिपायांची कामे करून घेतली जातात, असा आरोप करून जे.जे.मधील निवासी डॉक्टरांनी रविवारपासून अनुपस्थित राहून आंदोलन सुरू केले.
मात्र या आंदोलनात केवळ काही डॉक्टर सहभागी असून रुग्णाच्या उपचारांबाबत हेळसांड केल्याप्रकरणी कारवाई होण्याच्या भीतीने हे आंदोलन उभे राहिल्याचे अधिष्ठात्यांकडून सांगण्यात आले.
निवासी डॉक्टरांकडून कोणतीही चूक झालेली नाही. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी प्रशासनाकडून हे दावे केले जात आहेत, असा प्रत्यारोप मार्ड संघटनेच्या जे.जे.तील सदस्यांनी सांगितले. या आंदोलनाला मार्ड संघटनेकडून अधिकृत पाठिंबा दिला गेलेला नाही.
जे. जे.मधील निवासी डॉक्टरांची बाजू ऐकली. त्यांनी तूर्तास आंदोलन मागे घ्यावे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन आणि तपास करून याबाबत निर्णय घेण्यात येईल.
– विनोद तावडे, शिक्षणमंत्री