मुंबई: गोवंडी परिसरात अनेक अनधिकृत सिमेंट मिक्सर प्रकल्प असून त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व प्रकल्प महानगरपालिकेच्या एम पूर्व कार्यालयापासून जवळ आहेत. महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करून हे सिमेंट मिक्सर प्रकल्प बंद करावेत, अशी मागणी मनसेने केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गोवंडी परिसरातील देवनार कचराभूमी आणि एसएमएस कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे गोवंडी आणि आसपासच्या परिसरातील अनेक रहिवासी श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरात अनधिकृत सिमेंट मिक्सर प्रकल्प उभे राहिले आहेत. या सिमेंट मिक्सर प्रकल्पांमधून परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. सिमेंट मिक्सर प्रकल्पात येणाऱ्या-जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे येथील रस्त्यांचीही वाताहात होत आहे. त्यामुळे एकूणच या परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
हेही वाचा… गालगुंडाची नवी साथ; बहिरेपणाचा धोका; विषाणूमध्ये परिवर्तन झाल्याची तज्ज्ञांना शंका
आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व प्रकल्प महानगरपालिकेच्या एम पूर्व कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहेत. या प्रकल्पांमधून अखंड प्रदूषण होत असते. मात्र महापालिकेकडून याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने तत्काळ आशा प्रकल्पांवर कारवाई करून ते बंद करावेत अशी मागणी मनसेने केली आहे. याबाबत मनसेचे महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष सतीश वैद्य यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिकेला पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वैद्य यांनी दिला आहे.