लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: घाटकोपर पूर्व येथे पूर्ववैमनस्यातून एका माथेफिरूने स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर व लायटर हातात घेऊन सर्व रहिवाशांना जाळून टाकण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना आरोपीने काठीने मारहाण केली. अर्धातास चाललेल्या या थरारानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

घाटकोपर पूर्व परिसरातील भीमशक्ती रहिवासी संघ येथील काही रहिवाशांबरोबर आरोपी विनोद शर्माचे पूर्वीपासून वाद होते. त्यामुळे विनोदने नागरिकांना शिवीगाळ कली आणि त्यांना धमकावण्यासाठी घरातून सिलिंडर व लायटर घेऊन आला. विनोदने लायटर पेटवला आणि तेथील रहिवाशांना जाळून ठार मारण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक रहिवाशांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

आणखी वाचा-मुंबई :धक्का लागल्याने महिलेने छत्रीने बडवलं, पतीने ठोसा मारला, रुळावर पडलेल्या प्रवाशाचा ट्रेनखाली चिरडल्याने मृत्यू

त्यानुसार पंतनगर पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विनोदला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. विनोदला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. त्याने पोलीस हवालदार बाळकृष्ण काकड यांना धक्का मारून खाली पाडले व काठीने मारहाण केली. इतर पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर गुरूवारी विनोदविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तात्काळ त्याला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात मारहाणीचे चार गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दोन गुन्हे पंतनगर पोलीस ठाणे, तर पार्कसाईट पोलीस ठाणे व टिळक नगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents are threatened with burning with cylinders and lighters accuse arrested mumbai print news mrj