मुंबई : दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे शिवाजी पार्क परिसरात स्मृती स्मारक व्हावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. या संदर्भात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी बैठक पार पडली. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात प्रवेशद्वारालगत सुशोभीकरणाचा भाग म्हणून रमाकांत आचरेकर यांचे स्मृती स्मारक उभारण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे गुरू आणि अनेक नामवंत क्रिकेटपटू घडविण्यात मोलाचा वाटा असलेले क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे स्मृती स्मारक व्हावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दिगग्ज क्रिकेटपटू घडले. या खेळाडूंनी पुढे देशाचा नावलौकिक जगभर पोहोचवला. त्यामुळे रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या प्रवेशद्वार क्रमांक ५ जवळ सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून स्मृती स्मारक उभारावे, स्मारकासाठी जागा द्यावी, अशी मागणी क्रीडाप्रेमींनी केली आहे. पालकमंत्री केसरकर यांनी बैठकीत याबाबतची माहिती जाणून घेतली.

हेही वाचा >>>माजी मंत्री रवींद्र वायकर चौकशीला अनुपस्थित

या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे, सहायक आयुक्त (जी उत्तर) प्रशांत सपकाळे यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या बैठकीत क्रिकेटप्रेमी सुनील रामचंद्रन आणि परिसरातील नागरिकांनी पालकमंत्र्यांना प्रस्तावित स्मृती स्मारकाबाबत माहिती दिली. तसेच स्मारकाची संकल्पना असलेली छोटी प्रतिकृतीदेखील दाखविली. क्रिकेटप्रेमी आणि मैदान परिसरातील स्थानिक रहिवाशांनी स्वखर्चातून हे स्मृती स्मारक उभारणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents demand to guardian minister that late cricket coach ramakant achrekar memorial should be built in shivaji park mumbai print news amy
Show comments