लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: रात्री-अपरात्री ठिय्या मांडणारे समाजकंटक, मद्यपींना अटकाव करण्यासाठी प्रखर दिवे बसवून माहीम (प) परिसरातील मच्छीमार नगरमधील नाकोडा मैदान प्रकाशमान करण्यात आले. मात्र रात्रभर प्रकाशात उजळून निघणाऱ्या या मैदानात मध्यरात्रीनंतरही क्रिकेटचे सामने रंगू लागले असून लखलखीत प्रकाश आणि क्रिकेटच्या सामन्यांचा लगतच्या सोसायट्यांमधील रहिवाशांना प्रचंड त्रास होऊ लागला आहे. या संदर्भात रहिवाशांना माहीम पोलीस ठाणे, मुंबई महानगरपालिका आदींकडे तक्रारीही केल्या. परंतु रहिवाशांची या त्रासातून सुटका होऊ शकलेली नाही.
माहीम (प.) येथील मच्छीमार नगरमधील रहेजा रुग्णालयासमोर नाकोडा मैदान असून काही वर्षांपूर्वी या मैदानात समाजकंटकांचा वावर वाढला होता. है मैदान मद्यपींचा अड्डा बनला होता. त्यामुळे काही रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक, आमदार आणि मुंबई महानगरपालिकेकडे ही व्यथा मांडली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून मैदानात प्रखर दिवे बसविण्यात आले. त्यामुळे मैदान दिव्यांच्या उजेडात उजळून निघाले. यामुळे मद्यपींचा बंदोबस्त होईल असे रहिवाशांना वाटले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र काही दिवसातच संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत या मैदानात क्रिकेटचे सामने रंगू लागले. मध्यरात्रीनंतर २ वाजेपर्यंत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा दंगा सुरू झाला. या मैदानात विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. या नव्या त्रासामुळे आसपासच्या सोसायट्यांमधील रहिवासी हवालदिल झाले. ज्येष्ठ नागरिक, आजारी मंडळी आणि विद्यार्थ्यांना क्रिकेटच्या सामन्यांचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.
आणखी वाचा- ‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे ८७ टक्के काम पूर्ण; दुसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर
या संदर्भात माहीम आकाशगंगा को-ऑप. हौसिंग सोसायटीने मुंबईचे पोलीस आयुक्त, माहीम पोलीस ठाणे, मुंबई महानगरपालिकेचे जी-उत्तर विभाग कार्यालय, स्थानिक आमदार सदा सरवणकर आदींना लेखी पत्र पाठवून मैदानातील प्रखर उजेड आणि रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यांबाबत तक्रार केली. मात्र आजही मैदानात मध्यरात्रीनंतर क्रिकेट खेळणाऱ्यांचा ठोस बंदोबस्त करण्यात आलेला नाही, अशी खंत रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रात्रभर घरात येणारा प्रखर उजेड आणि क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा गोंगाट यामुळे रहिवाशांची झोपमोड होत आहे. मैदातातील प्रखर दिव्यांचा उजेड घरात येत असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. अखेर दिवे रात्री बंद करण्यास सुरुवात झाली. मात्र काही समाजकंटक पुन्हा देवे सुरू करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या मैदानात सुरक्षा रक्षक तैनात करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
आणखी वाचा- शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या साखर कारखान्यांवर टाचच आठ कारखान्यांवर कारवाई; ५२४ कोटी थकविले
या मैदानापासून हाकेच्या अंतरावर माहीम पोलीस ठाणे आहे. परंतु पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना या प्रश्नावर ठोस कारवाई करता आलेली नाही. रहिवाशांनी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतरच पोलीस क्रिकेट खेळणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी येतात. पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा क्रिकेटचा सामना सुरू होतो. पोलिसांनी नियमित गस्त घातल्यास येथील अनेक अनैतिक प्रकारांना आळा बसू शकेल, अशी विनंती रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
नाकोडा मैदान म्हाडाच्या अखत्यारित आहे. मात्र हे मैदान म्हाडाने मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मैदानातील सोयी-सुविधांची जबाबदारी आणि होणाऱ्या त्रासाचा बंदोबस्त करण्याबाबत दोन्ही यंत्रणांनी कानावर हात ठेवले आहेत.