आंगडिया कर्मचाऱ्यावर गोळीबार करून त्याला लुटण्याचा प्रयत्न गुरुवारी सकाळी चर्नी रोडच्या गुलालवाडी येथे झाला. मात्र पळणाऱ्या एका आरोपीला लोकांनी पकडले. त्याचे उर्वरित सहा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले.
गुलालवाडीतील श्रीजी इमारतीत पूर्णिमा आंगडियाचे कार्यालय आहे. त्याच्या व्यवहाराचे पैसे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात येत असतात. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास नेहमीप्रमाणे या कार्यालयातील चार कर्मचारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून पैशांच्या बॅगा घेऊन आले. सोबत नागपाडा पोलिसांची सुरक्षा होती. कार्यालय आल्यावर पोलीस निघून गेले आणि चार कर्मचारी या बॅगा कार्यालयात नेत होते. त्या वेळी तेथे सहाजण दबा धरून बसले होते. त्यातील चौघे इनोवा गाडीत तर दोघे दुचाकीवर होते. त्यांनी सुरुवातीला हवेत दोन गोळ्या झाडत सुरताजी प्रजापती (४५) या कर्मचाऱ्याकडील बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोध केल्यावर हल्लेखोरांनी त्यांच्या हातावर आणखी दोन गोळ्या झाडल्या. हल्लेखोर प्रजापतीकडील १ लाख ३० हजार रुपयांची बॅग घेऊन पसार झाले. तोवर आलेल्या रहिवाशांनी दुचाकीवरून पळून जाणाऱ्या मोहम्मद पठाण याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.  त्याच्यावर याआधीच १७ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) कृष्णप्रकाश यांनी दिली.

Story img Loader