दादरच्या शिवाजी महाराज उद्यानाच्या आसपासच्या रहिवाशांना पुन्हा एकदा धुळीचा त्रास होऊ लागला आहे. धुळीची समस्या दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत केलेल्या सर्व उपाययोजना, प्रयोग फसले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून शिवाजी पार्क येथील रहिवाशांचा धुळीच्या समस्येविरोधात लढा सुरू असून त्यावर अद्याप तोडगा सापडलेला नाही. त्यामुळे रहिवाशांना आता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे धाव घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकीय पक्षांच्या सभानी गाजलेले शिवाजी महाराज मैदान पुन्हा एकदा धुळीच्या समस्येमुळे चर्चेत आले आहे. खेळाडूंसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे असलेले हे मैदान सध्या तेथील रहिवाशांच्या आजारपणाचे कारण ठरू लागले आहे. वाऱ्याबरोबर मैदानातील धूळ उडण्याची समस्या पुन्हा एकदा सुरू झाली असून रहिवाशांनी आता या प्रकरणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे धाव घेतली आहे.

हेही वाचा >>> डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक : पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारची उपसमिती गाझियाबादला रवाना

तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात विविध खेळ खेळण्यासाठी मुले येतात. विविध क्लबच्या आठ खेळपट्ट्या या मैदानात आहेत. हे क्लब आपापल्या परिसराची देखभाल व स्वच्छता करतात. मात्र त्याव्यतिरिक्त मैदानाचा परिसर दुर्लक्षितच आहे. तसेच विविध राजकीय, धार्मिक सभा आणि कार्यक्रमांनंतरही या मैदानाची दुर्दशा होते. त्यामुळे धुळीची समस्या दूर करण्यासाठी आतापर्यंत रहिवाशांनी अनेकदा महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र गेल्या आठ वर्षांत या समस्येवर तोडगा निघू शकला नाही. या समस्येमध्ये लक्ष घालून तोडगा काढावा, अशी विनंती प्रदुषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून करण्यात आल्याची माहिती रहिवासी संघाचे सुहास पटवर्धन यांनी दिली.

मैदानातील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी हिरव्या गवताची लागवड केली होती. तसेच पर्जन्य जलसंचय यंत्रणा, तुषार सिंचन असेही अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर, तसेच राजकीय हस्तक्षेपानंतर हे सगळे प्रयोग अर्धवट राहिले. गवत तयार करण्यासाठी या मैदानावर मोठ्या प्रमाणावर माती टाकण्यात आली होती. पण हिरवळीचा प्रयोग फसल्यानंतर आता उरलेली माती वाऱ्याबरोबर उडत असून धुळीचा त्रास वाढल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> मुंबई : रेल्वेला ‘ळ’चे वावडे; रेल्वे स्थानकांच्या हिंदी नावातील ‘ल’च्या जागी ‘ळ’ करण्याकडे दुर्लक्ष

महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाने मैदानाच्या देखभालीचेही कंत्राट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र त्यादेखील रद्द झाल्या. त्यामुळे मैदानातील धुळीच्या त्रासाचा प्रश्न सुटलेला नाही.  मात्र या धुळीच्या साम्राज्यामुळे परिसरातील रहिवासी व मैदानात खेळायला, फेरफटका मारायला येणाऱ्यांना श्वासोच्छवासाचे व त्वचेचे आजार होत असल्याचे येथील रहिवासी डॉ. गिरीश काटेगिरी यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत महानगरपालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या या मैदानाची देखभाल विभाग कार्यालयामार्फतच करण्यात येत आहे. धुळीचा त्रास होऊ नये म्हणून मैदानात पाणी मारण्याची व्यवस्था केली आहे. कर्मचाऱ्यांमार्फत मैदानात पाणी मारण्याचे काम करण्यात येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents in shivaji park area once again suffering from dust problem mumbai print news zws