मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून चेंबूर परिसरातील डोंगरावर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पाण्याची तीव्र चणचण भासत असून मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी वरळी येथील जल अभियंत्यांच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
चेंबूरमधील महानगरपालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयाच्या हद्दीतील भारत नगर, रायगड चाळ, मास्तर चाळ, गणेश चाळ, एमजी केमिकल, भीम टोला या भागात गेल्या अनेक महिन्यापासून तुटपूंजा पाणीपुरवठा होत आहे. या भागात झोपडपट्टी असून डोंगरावर मोठी लोकवस्ती वसली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रहिवाशांना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, नागरिकांना डोंगरच्या पायथ्याशी जाऊन पाणी आणावे लागत आहे.
हेही वाचा >>>मुंबईत मराठा समाजाचं गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत आंदोलन, मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी
या संदर्भात रहिवाशांनी अनेक वेळा महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र तक्रार केल्यानंतर अधिकारी केवळ पाहणी करून जातात. मात्र पुढे काहीच होत नाही. आजही पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत. चेंबूरच्या विविध भागांमध्ये महानगरपालिकेकडून २४ तास पाणीपुरवठा केला जातो, मग याच भागाला सापत्न वागणूक का देण्यात येत आहे, असा सवाल या रहिवाशांनी केला आहे. येत्या चार दिवसांत पाण्याची समस्या सोडली नाही, तर वरळी येथील जल भियंताच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिला आहे.