मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून खोदून ठेवलेले रस्ते पूर्ण करा असा इशारा कुलाब्यातील नागरिकांनी दिला आहे. फर्स्ट पास्ता लेन आणि विंडी हॉल लेन या रस्त्यांची कामे अर्धवट सोडून दिली असून त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होते आहे. त्यामुळे हे रस्ते पूर्ण करण्यासाठी रहिवाशांनी मुंबई महापालिकेला २७ फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटिकरणाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. मात्र शहर भागातील कामे निविदा प्रक्रियेतील घोळामुळे सुरू होऊ शकली नव्हती. ऑक्टोबर २०२४ पासून ही कामे सुरू झाली आहेत. मात्र कुलाब्यातील रहिवाशांचा त्रास काही संपताना दिसत नाही. फर्स्ट पास्ता लेन आणि विंडी हॉल लेनसह इतर महत्त्वाचे रस्ते, अनेक महिन्यांपासून खोदून ठेवले आहेत. ज्यामुळे रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे. या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले आहे. अर्धवट अवस्थेत असलेली ही कामे पूर्ण करण्यासाठी त्यांनी पालिका प्रशासनाला २७ फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिली आहे.

आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नार्वेकर यांनी म्हटले आहे की, सिमेंट काँक्रीटच्या कामांमुळे कुलाबा येथील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ते खोदून ठेवल्यामुळे चालणे मुश्किल झाले आहे. रस्ता तातडीने पूर्ववत केला नाही तर नागरिकांसह त्याच रस्त्यांवर उतरून आंदोलन करू, असा इशारा नार्वेकर यांनी दिला आहे.

पालिकेचे अभियंते आणि कंत्राटदार यांच्यात संगनमत असल्याचा आरोपही नार्वेकर यांनी केला आहे. रस्त्यांच्या कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल कंत्राटदाराला ५० हजार रुपयांपर्यंत दंड करण्याचा अधिकार कार्यकारी अभियंत्यांना आहे, परंतु कंत्राटदारावर क्षुल्लक रक्कम दंड म्हणून आकारण्यात आली आहे. यामुळे कंत्राटदार आणि अभियंते यांच्यामध्ये संगनमत असल्याचा संशय निर्माण होतो, असे नार्वेकर यांनी पत्रात म्हटले आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने बेकरींमध्ये लाकूड आणि कोळशावर बंदी घातली आहे. मात्र रस्त्यांच्या कामांमुळे प्रदूषणात भर पडत आहे याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे, असाही मुद्दा नार्वेकर यांनी मांडला आहे.

दरम्यान, मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे प्रगतिपथावर आहेत. शहर विभाग, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे कार्यक्षेत्रात काँक्रीटीकरण कामे सुरू आहेत. मुंबईत एकूण २०५० किमी लांबीचे रस्ते मुंबई महापालिकेच्या आखत्यारित येतात. त्यापैकी गेल्या काही वर्षात एकूण १३३३ किमी म्हणजेच ६५ टक्के रस्त्याचे काँक्रीटिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांच्या काँक्रीटिकरणाची कामे पालिकेने दोन टप्प्यात हाती घेतली आहे. त्यापैकी काही कामे आता सुरू आहेत. सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य महापालिका यंत्रणेपुढे आहे.