मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे, मात्र या पुनर्विकासाला मोठ्या संख्येने धारावीकरांचा विरोध असून हा विरोध वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून समोर येतो. तर दुसरीकडे धारावी पुनर्विकासाला समर्थन देणाऱ्या धारावीकरांचाही एक गट आहे. याच समर्थक गटाने शनिवारी धारावीचा पुनर्विकास वेगाने मार्गी लागावा यासाठी मार्चा काढला होता. पुनर्विकासाच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने धारावीकर या मोर्चात सहभागी झाले होते. धारावी पुनर्विकासात खोडा घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी पुनर्विकास समर्थक धारावीकरांनी केली. तर यासंबंधीचे निवेदन लवकरच धारावी पुनर्विकास प्रकल्पास (डीआरपी) देण्यात येणार असल्याचे पुनर्विकास समर्थकांकडून सांगण्यात आले.
धारावी पुनर्विकासाअंतर्गत सध्या नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून (एनएमडीपीएल) सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या सर्वेक्षणाद्वारे धारावीकरांची पात्र-अपात्रता निश्चिती केली जाणार आहे. अपात्र धारावीकरांना धारावीबाहेर घरे दिली जाणार आहे. याला धारावीकरांचा विरोध असून सर्व धारावीकर पात्र आहेत, त्यांना धारावीतच घरे मिळायला हवी, अशी मागणी धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने धारावीकरांकडून करण्यात येत आहे. याच मागणीच्या अनुषंगाने धारावीकरांकडून सर्वेक्षणाला, पुनर्विकासाला विरोध होत आहे. तर धारावीकरांची ५०० चौरस फुटांच्या घराचीही मागणी आहे. असे असताना दुसरीकडे मात्र धारावी पुनर्विकास लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी मागणी करणारेही धारावीकर आहेत. याच धारावीकरांनी दी साऊथ इंडियन नाडार महाजन संघम, प्रगती महिला सेवा मंडळ यांसह अन्य संस्थांच्या माध्यमातून एका मोर्चाचे आयोजन केले होते.
शीव रेल्वे स्थानकाबाहेरून सकाळी ११.३० च्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली आणि या मोर्चाची सांगता वांद्रे पूर्व येथे म्हाडा मुख्यालयाजवळ झाली. यावेळी पुनर्विकास समर्थकांनी धारावी पुनर्विकास अत्यंत गरजेचा असल्याने तो वेगाने मार्गी लावण्याची मागणी केली. पुनर्विकासात खोडा निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. डीआरपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोमवारी यासंबंधीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले. तर धारावी समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात धारावीकरांऐवजी धारावीबाहेरील नागरिकांचाच अधिक सहभाग होता. हा मोर्चा अदानी पुरस्कृत होता, असा आरोप धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड राजू कोरडे यांनी केला.