मुंबई : म्हाडाच्या ३८८ इमारतींमधील रहिवाशांच्या घराच्या पुनर्विकासासाठी म्हाडा संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात बुधवार, २८ ऑगस्ट रोजी म्हाडा मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. वांद्रे येथील चेतना महाविद्यालयापासून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. चेतना महाविद्यालयापासून म्हाडा मुख्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या या मोर्चात म्हाडा पुनर्रचित ३८८ इमारतींमधील बहुसंख्य रहिवाशी सहभागी होणार आहेत.
हेही वाचा – तरूणांमध्ये हर्नियाच्या त्रासात २० टक्के वाढ!
नगरविकास खाते व सरकारने विनियम ३३(२४) अध्यादेश काढावा, पुनर्विकासात अडथळा ठरणारी २० टक्के प्रीमियमची जाचक अट विनियम ३३ (१०) प्रमाणे शिथिल करावी, पुनर्विकास प्रकल्प सादर करताना म्हाडातर्फे मागण्यात येणारा दुरुस्ती खर्चाची तरतूद रद्द करावी, म्हाडाच्या एकल भूखंडावरील इमारतींचा अपुऱ्या जागेमुळे पुनर्विकास रखडलेला असून आजूबाजूच्या उपकर प्राप्त इमारतींसोबत एकत्रित पुनर्विकासासाठी म्हाडाने पुढाकार घ्यावा, म्हाडाच्या मालकीच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून प्रकल्पाला मान्यता देण्याचे अधिकार म्हाडा प्रशासनाकडे असावेत, वारसा हक्काने गाळे हस्तांतर प्रक्रियेत वारसा प्रमाणपत्राची जाचक व खर्चिक अट रद्द करून त्याऐवजी पूर्वीप्रमाणे क्षतपूर्ती बंध प्रकिया सुरू करावी, या प्रमुख मागण्या म्हाडा संघर्ष कृती समितीकडून करण्यात आल्या आहेत. २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या धडक मोर्चात म्हाडाच्या ३८८ पुनर्रचित इमारतींमधील रहिवाशांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन म्हाडा संघर्ष कृती समितीने केले आहे.
© The Indian Express (P) Ltd