लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : वरळी बीडीडीमधील ३५ हून अधिक चाळींतील रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता प्रत्यक्ष मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना या रहिवाशांनी बहिष्काराचा निर्णय मागे घेतला आहे. त्यानुसार उद्या, बुधवारी ३५ हून अधिक चाळींतील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बीडीडी पुनर्विकासाबाबतच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर रहिवाशांनी मतदानावरील बहिष्काराचा निर्णय मागे घेतला आहे.

ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे. या पुनर्विकासाअंतर्गत वरळी येथे पहिल्या टप्प्यात ५५० घरांचे बांधकाम करण्यात येत आहे. या घरांचा समावेश असलेल्या बहुमजली इमारतींचे काम मार्च – एप्रिल २०२५ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. काम पूर्ण झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर या घरांचा ताबा पात्र रहिवाशांना दिला जाणार आहे.

आणखी वाचा-मतदानासाठी ३० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा

दरम्यान, मुंबई मंडळाने पहिल्या टप्प्यातील घरांसाठी आधीच पात्र रहिवासी निश्चित केले आहेत. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील रहिवाशांचीही निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील घरे निश्चित केलेल्या रहिवाशांनाच देणे बंधनकारक आहे. असे असताना मुंबई मंडळाने पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या ३५ हून अधिक इमारतींतील रहिवाशांना डावलून पहिल्या टप्प्यातील घरे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील काही पात्र रहिवाशांना देण्याचे निश्चित केले आहे. मंडळाच्या निर्णयावर ३५ हून अधिक चाळींतील रहिवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत त्याला विरोध केला आहे. त्यातूनच या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

आणखी वाचा-सैफी रुग्णालयाबाहेरील प्रस्तावित पादचारी पुलाच्या बांधकामाला अंतरिम स्थगिती

मत मागण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने आमच्या इमारतीत पाय ठेवू नये अशा आशयाचे फलक वरळीतील अनेक चाळींमध्ये महिन्याभरापूर्वीच लावण्यात आले होते. मतदानावरील बहिष्कारावर रहिवासी ठाम होते. मात्र आता त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. रहिवासी आणि सर्व पक्षांतील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर, कोणताही अन्याय होणार नाही यासंबंधीचे आश्वासन मिळाल्यानंतर रहिवाशांनी मतदान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती येथील रहिवासी निलेश गायकवाड यांनी दिली. त्यामुळे आता २० नोव्हेंबर रोजी सर्व रहिवासी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents of more than 35 chawl in worli bdd will vote decision to boycott cancelled mumbai print news mrj