मुंबई : गोवंडी परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या शताब्दी रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही त्याकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याने काही स्थानिक रहिवाशांनी शुक्रवारी सकाळपासून येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले.
गेल्या अनेक महिन्यापासून गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात विविध सामस्यांचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. या रुग्णालयात गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द, चेंबूर, आणि देवनार परिसरातील आठशे ते हजार रुग्ण रोज तपासणीसाठी येतात. मात्र रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे रुग्णांना राजावाडी, शीव अथवा खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी पालिकेला अनेक वेळा पत्रव्यवहार करून येथील समस्यांवर तोडगा काढण्याची विनंती केली. मात्र पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत नगराळे यांनी काही स्थानिक रहिवाशांसोबत शुक्रवारी रुग्णालयाबाहेर लाक्षणिक उपोषणाला बसले.