इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता
मुंबई : ग्रॅन्ट रोड, नानाचौक येथील ‘सचिनम हाईट्स’ या २० मजली इमारतीत २२ जानेवारीला झालेल्या आगच्या दुर्घटनेनंतर या इमारतीतील रहिवासी बेघर झाले आहे. या इमारतीच्या वीजवाहिन्या पूर्णत: वितळून गेल्या असून वीज वाहिन्यांची यंत्रणा उभारण्यास एक ते दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांनी नातेवाईकांकडे किंवा भाडय़ाच्या घरात आसरा घ्यावा लागला आहे.
नानाचौक येथील भाटिया रुग्णालयासमोर असलेल्या ‘सचिनम हाईट्स’ या २० मजली इमारतीला २२ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले होते. या आगीची तीव्रता इतकी होती की इमारतीतील वीज वाहिन्यांचे जाळे वितळून गेले आहे. वीज वाहिन्यांचे जाळे पुन्हा नव्याने उभारण्यात येत नाही तोपर्यंत रहिवाशांना या इमारतीत राहता येणार नाही. त्यामुळे या इमारतीतील रहिवासी गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून अन्यत्र आश्रयाला आहेत.
या इमारतीतील विद्युत वाहिन्यांचे काम करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यातच सोसायटी स्थापन झालेली असल्यामुळे विकासकानेही या प्रकरणात लक्ष घातलेले नाही. तर दुसरम्ीकडे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांपैकी काही जण रुग्णालयात गंभीर अवस्थेत आहेत. त्यामुळे या कामाबाबत आता रहिवाशांनीच हळूहळू पुढाकार घ्यायला सुरुवात केली आहे. या इमारतीत रहिवाशांना प्रवेशबंदी असून रहिवाशांना आपल्या घरातील सामान हवे असल्यास खाली नावाची नोंद करून सामान आणू दिले जात आहे.
या इमारतीमधील एकोणीसाव्या मजल्यावरील एका घरात मोठय़ा प्रमाणावर आग लागली होती. पण त्याचबरोबर इमारतीला विद्युतपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्यांच्या डक्टमध्येही आग पसरली होती. त्यामुळे आता डक्टमध्ये परांची बांधून विद्युत वाहिन्यांचे जाळे उभारावे लागणार आहे. तसेच मीटर बॉक्सपासून प्रत्येक घरापर्यंत विद्युत वाहिन्यांचे जाळे उभारावे लागणार आहेत. त्यामुळे याला वेळ लागण्याची शक्यता असल्याचे मत सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केले.
चौकशी अहवाल लवकरच
आगीच्या या घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी समिती नेमली होती आणि पंधरा दिवसांच्या आत दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण, आग पसरून सहा नागरिकांचा मृत्यू होण्यामागील कारण आणि सदर इमारतीच्या मंजूर आराखडय़ामध्ये कोणतेही विनापरवानगी बदल करण्यात आले असल्यास त्याची शहानिशा या चौकशीदरम्यान केली जाणार आहे. समितीने अहवाल तयार केला असून लवकरच पालिका आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे.
दोन महिन्यांसाठी भाडय़ाने घरे
दुर्घटनेच्या दिवशी सकाळी या इमारतीतील रहिवाशांनी घर सोडले, तेव्हापासून हे रहिवासी घराबाहेरच राहत आहे. अनेकांनी आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतला होता. मात्र विद्युत वाहिन्यांचे काम लांबल्यामुळे अखेर आता यापैकी अनेक रहिवाशांवर मिळेल तिथे एक दोन महिन्यांसाठी घरे भाडय़ाने घेऊन राहण्याची वेळ आली आहे.