मुंबईतील वाहतूक नियंत्रणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना अंधेरीच्या लोखंडवालामध्ये रहिवासीच पोलिसांच्या खांद्याला खांदा लावत वाहतूक नियोजनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

लोखंडवाला वसाहतीला वाकुर्ली हा रस्ता पश्चिम महामार्गाशी जोडतो. महामार्गाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. मालाड आणि अंधेरीच्या अंतर्गत भागात जाण्यासाठी वाहने याच मार्गाचा वापर करतात. त्यातच चुकीच्या वाहतूक नियोजनामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीला लोखंडवालावासीयांना नेहमीच सामोरे जावे लागत होते. रिक्षावाल्यांकडून चुकीच्या मार्गाचा होणारा वापर, वाहतूक नियमांचे पालन न करता बेदरकारपणे वाहन चालविण्याची वृत्ती यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी इथे निर्माण होत असे. यावर तोडगा म्हणून लोखंडवाला रेसिडेंट असोसिएशनचे काही कार्यकत्रे गेले चार दिवस वाकुर्ली रस्तावर वाहतूक पोलिसांच्या बरोबरीने वाहतूक कोंडी सोडवण्याची कसरत करत आहेत आणि त्यात त्यांना यशही येत आहे.

लोखंडवाला वसाहत ते पश्चिम महामार्ग हे दीड किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सकाळच्या वेळेस साधारण एक तास लागत असे, पण गेल्या चार दिवसांत कार्यकर्त्यांनी केलेल्या योग्य वाहतूक नियोजनामुळे आता हे अंतर कापण्यात चार ते पाच मिनिटांचाच अवधी लागत आहे. असोसिएशनचे १५ कार्यकत्रे सकाळी ७ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते १० या वेळेत या ठिकाणी नियोजन करत असतात. येत्या रविवापर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचा असोसिएशनचा मानस आहे. मुंबईतील वाहतुकीचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास वाहतूक कोंडी कमी करण्यास आपण यशस्वी होऊ शकतो हेच वाहतूक विभागाला दाखवण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे असोसिएशनचे सदस्य समीर गुरव यांनी सांगितले.

खड्डय़ांचीही दुरुस्ती

वाहतूक कोंडी दूर करण्यात रहिवाशांना यश आले; परंतु रस्त्यावरील खड्डय़ांमुळे त्याला म्हणावे तसे यश येत नव्हते. म्हणून असोसिएशनने स्वखर्चाने ४० गोणी रेती आणून खड्डे बुजवण्याचे काम केले. खड्डे बुजवल्याने वाहतुकीला आणखी वेग आला, असे गुरव यांनी सांगितले.

Story img Loader