मुंबई : खार भुयारी मार्गात (खार सबवे) होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने एक उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असून स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. तब्बल २४०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून निवासी भागातून हा पूल जात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी या पुलाला विरोध केला असून पूल उभारण्याऐवजी समस्या सोडवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेने खार पूर्व आणि खार पश्चिम परिसर जोडण्यासाठी एक उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा मार्ग पुढे पश्चिम दृतगती मार्गाला जोडला जाण्यात येणार आहे. या मार्गामुळे खार सब वेसह सांताक्रूझ पूर्व पट्ट्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा दावा महापालिकेने केला होता. सुमारे २४०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी निविदाही काढण्यात आली आहे. मात्र खार, सांताक्रूझमधील १४० हून अधिक इमारतींतील रहिवाशांनी या उन्नत मार्गाला विरोध दर्शविला आहे. पुलाचे चुकीचे संरेखन, उन्नत मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम परिसरात राहणाऱ्यांना याचा न होणारा फायदा इत्यादी मुद्दे उपस्थित करून ‘सांताक्रूझ ईस्ट रेसिडेंट असोसिएशन’ने विरोध केला आहे. मुंबई महापालिकेने चार भागात उन्नत मार्ग बनवण्याचे नियोजन केले असून त्यासाठी २४०० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा…उपकरप्राप्त इमारतींसाठीच महाराष्ट्राचा कायदा! सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
हा पूल बांधण्याच्या कामात हवाई दलाची जमीन अडसर ठरत आहे. त्यामुळे पालिकेने या पुलाच्या आरेखनात बदल केला आहे. हा उन्नत मार्ग खार सब वेवरून सांताक्रूझ पूर्व व्ही. एन. देसाई रूग्णालय परिसरातून निवासी भागातून पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत जाणार आहे. त्याला संघटनेचा विरोध आहे.
सांताक्रूझ पूर्व रेसिडेन्ट असोसिएशनच्या अध्यक्षा हेमलता मेहता यांनी सांगितले की, या उन्नत मार्गाचे संरेखन योग्य नसून त्यामुळे परिसरातील १४० इमारतींमधील रहिवाशांना त्रास होणार आहे. त्यापेक्षा पालिकेने आधी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. झोपड्या हटवाव्या त्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. या पुलाचा मार्ग बदलावा किंवा पुलाची निविदा रद्द करावी, अशी मागणी संघटनेने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा…वाढत्या तापमानामुळे मुंबईकर घसादुखीने हैराण
दरम्यान, खार सब वे हा भूमिगत मार्ग नसून तो जमिनीला समांतर मार्ग आहे व त्यावरून रेल्वेचे रुळ जातात. त्यामुळे त्यावरून उन्नत मार्ग नेला तर त्याची उंची किती होईल, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते झोरू भतेना यांनी केला आहे. तसेच पूल बांधण्याऐवजी पालिकेने विकास आराखड्यातील प्रस्तावित पर्यायी रस्ता तयार करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा…म्हाडातील फंजीबल चटईक्षेत्रफळ घोटाळा; आतापर्यंत मंजूर प्रस्तावांची छाननी होणार
खार पूर्व परिसरातील रेल्वे मार्ग आणि सांताक्रूझदरम्यान संरक्षण दलाची जमीन असून उन्नत मार्गासाठी या जमिनीची उपलब्धता गरजेची आहे. ही जमीन अद्यापही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे होणारा विरोध आणि उपलब्ध न झालेली जमीन यामुळे उन्नत मार्गाबाबत अद्याप काहीही निर्णय घेतला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.