मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवडी पूर्व आणि पश्चिम, तसेच काळाचौकी परिसरात अघोषित पाणी कपात सुरू असल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. नियमित वेळेपेक्षा अंदाजे १० ते ३० मिनिटे कमी पाणीपुरवठा होत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे.
वातावरणातील उष्मा वाढू लागला असून पुढील तीन ते चार महिने हा पाणीसाठा पुरवावा लागणार आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील अनेक भागात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शिवडी पूर्व व पश्चिम विभागातील नियमित वेळेपेक्षा अंदाजे १० ते ३० मिनिटे कमी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला आहे.
रेतीबंदर परिसरात संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या भागातील पाणीपुरवठा ८.४५ लाच बंद होतो. तर शिवडी गाडी अड्डा येथील पाणीपुरवठ्याची वेळ संध्याकाळी ७ ते ९ अशी आहे. मात्र या भागात ७.१० नंतर पाणी येते व ८.४५ वाजताच जाते. इंदिरा नगर, हाजी बंदर रोड, फोर्सबेरी रोड येथील पाणीपुरवठ्याची वेळ ६.४५ ते ८.४५ अशी आहे. प्रत्यक्षात अर्धा तास पाणीपुरवठा कमी होतो अशी येथील रहिवाशांची तक्रार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी सचिन पडवळ यांनी पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे ऑक्टोबरमध्येही आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र तरीही या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.