मुंबई : ‘सुखाचा प्रवास, गतिमान प्रवास’ असे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या सागरी किनारा मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वेगवान गाड्यांच्या स्पर्धांमुळे (रेसिंग) नागरिकांना सुखाची झोप मिळेनाशी झाली आहे. रात्री १० ते १२ या वेळेत धनदांडग्यांच्या महागड्या गाड्या, मोठा आवाज करणाऱ्या स्पोर्ट्स कार यांची स्पर्धा रंगत असल्यामुळे प्रचंड त्रास होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
हेही वाचा >>> राज्यभरात थंडी कमी झाली जाणूण घ्या, किमान तापमानात वाढ होण्याची कारणे
सागरी किनारा मार्गाची जाहिरात करताना कोणताही सिग्नल किंवा अडथळा नसल्यामुळे थेट उपनगरात जाता येईल, असे सांगितले जात होते. मात्र आता हे वैशिष्ट्यच परिसरातील लोकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. रात्री १० नंतर या मार्गावर रेसिंग करणाऱ्या महागड्या गाड्या धावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या हा मार्ग सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूकीसाठी खुला आहे. त्यामुळे रात्री १० ते १२ या वेळेत या मार्गावर चारचाकी गाड्यांची स्पर्धा सुरू असते. परिसरातील रहिवासी आणि व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी विरेन शहा यांनी याप्रकरणी वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले आहे.
फेरीवाल्यांचा वावर?
सागरी किनारा मार्गावर दुचाकी, पादचाऱ्यांना जाण्यास बंदी आहे. मात्र वांद्रे येथे मार्गावर शेंगदाणे विकणारे फिरत असल्याची छायाचित्रे काही नागरिकांनी समाजमाध्यमांवर टाकली आहेत.
श्रीमंतांच्या गाड्या रात्रीच्या वेळी सागरी किनारा मार्गावर धावतात. मोठा आवाज करणाऱ्या स्पोर्टस कार, स्पोर्टस कारमध्ये रूपांतरित केलेल्या मोटारी मोठ्याने आवाज करत पळत असतात. ही स्पर्धा आणि आवाज वाढतच चालले असून परिसरातील लोकांना त्याचा त्रास होत आहे. – विरेन शहा, तक्रारदार