लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : वडाळ्यातील पारसी कॉलनी जिमखान्यात वारंवार होणारे विवाह समारंभ, मनोरंजनपर आणि व्यावसायिक कार्यक्रम यामुळे या परिसरातील रहिवाशांना वर्षभर अनेक गैरसोयींनी, ध्वनिप्रदूषणाला सामोरे जावे लागते आहे. मुंबई महापालिकेने जिमखाना एका संस्थेला भाडेतत्त्वावर दिला असून महसुलासाठी या भूखंडावर लग्न समारंभांना परवानगी दिली आहे. त्याकरीता आखलेल्या धोरणात अनेक अटी घातल्या असल्या तरी त्यांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी आज तरी कोणतीही व्यवस्था नाही. या समारंभाच्या ठिकाणी आग लागण्याचाही धोका असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
दादर पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेल्या पारसी कॉलनी जिमखान्यात गेली कित्येक वर्षे वारंवार विवाहसमारंभ, मनोरंजनपर कार्यक्रम, व्यावसायिक कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमांमुळे या परिसरात राहणाऱ्यांना अनेक गैरसोयींचा, प्रचंड आवाजाचा सामना करावा लागतो. या प्रकरणी ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरावर पाठपुरावा केला आहे. तसेच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनाही नुकतेच पत्र पाठवून याबाबत कळवले आहे. मात्र तरीही या जिमखान्यावरील समारंभ आणि त्यामुळे होणारा त्रास कमी झालेला नाही. जिमखानालगतच्या इमारतीतच साळगावकर वास्तव्यास असून त्यांना रोज हा त्रास सहन करावा लागतो.
आणखी वाचा-मानवी चुका, यंत्रणेतील दोष, बोटीला जलसमाधी, बस, रस्ते अपघातांतील जीवितहानीचे मावळते वर्ष साक्षीदार
साळगावकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, वारंवार होणाऱ्या या कार्यक्रमांच्या वेळी मुख्य रस्त्यावर गाड्या उभ्या केल्या जात असल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होते. कार्यक्रमाच्या गॅस सिलिंडरचा वापर करून मैदानातच स्वयंपाक केला जातो. तिन्ही बाजूंनी बंद असलेल्या या मैदानावर आग लागण्याचा धोका आहे. तसेच सिंथेटिक कापडाचा वापर करून बांधलेल्या मंडपात ही आग मोठ्या प्रमाणावर पसरू शकते. तसे झाल्यास अग्निशमन दलाच्या गाड्याही आत शिरू शकणार नाही अशी परिस्थिती असते. त्याचबरोबर प्रत्येक समारंभाला इथे मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक, बेसूर आवाजातली गाणी उशीरापर्यंत सुरू असतात. कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत भांड्याचा, सामान आवरण्याचा आवाज यामुळे रहिवाशांना त्रास होतो.
दरम्यान, याबाबत पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या व पालिकेच्या एफ उत्तर विभाग कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुळ करारात खेळाव्यतिरिक्तच्या कार्यक्रमाला परवानगी नसली तरी १९८३ मध्ये धोरणात बदल करण्यात आला. हे धोरण २०२२ मध्ये सुधारितही करण्यात आले. त्यानुसार भाड्याने दिलेल्या भूखंडांवर लग्न समारंभ व अन्य समारंभासाठी परवानगी दिली जाते. त्याकरीता अटी व शर्ती घातलेल्या आहेत. या अटींचे पालन होते की नाही हे यापुढील कार्यक्रमाच्या वेळी नक्कीच तपासले जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मक्त्याने दिलेल्या भूखंडावर कधी व किती कार्यक्रम होतात याची नोंद करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले जाणार असून त्यामुळे यावर निर्बंध आणले जातील, असेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-अजित पवारांचे सूचक मौन, देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सर्वपक्षीय टीका
दीडशे दिवसांसाठी परवानगी
नव्या धोरणानुसार संपूर्ण वर्षभरात समारंभासाठी दीडशे दिवसांसाठी वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत दिवे बंद करावे, या काळात रहिवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, कार्यक्रमासाठी वैद्याकीय आरोग्य अधिकारी, अग्निशमन दलाची परवानगी, विभाग कार्यालयाची परवानगी, वाहतूक पोलिसांची परवानगी अशा अनेक अटी आहेत. मात्र त्याचे पालन होते की नाही हे पाहणारी कोणतीही व्यवस्था सध्या तरी नाही.
पारसी जिमखान्यावर खेळाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही व्यावसायिक कार्यक्रम करण्यास मूळ भाडेकरारात मज्जाव आहे. तसाच निकाल लोकायुक्तांनीही २०११ मध्ये दिला आहे. पोलिस उपायुक्त सुनील रामानंद यांनीही या मैदानावर ध्वनिक्षेपकाला बंदी असल्याचे आदेश जारी केले होते. तरीही हे समारंभ होतच आहेत. रहिवाशांना प्रचंड त्रास होतो. मी लेखक आहे आणि माझ्याच घरात लिहिण्याइतकीही शांतता मिळू शकत नाही. -जयराज साळगावकर