कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा पेटलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली.
विद्या चव्हाण म्हणाल्या, “आज राज्यपालांना आम्ही यासाठी भेटायला आलो की ज्या महाराष्ट्राचे ते राज्यपाल आहेत. तो महाराष्ट्र ज्या जिजाऊंनी शिवबाला घडवलं त्या जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्राने सावित्रीबाईला शिकवलं तिचा महाराष्ट्र आहे. इथे जाती, धर्मापलीकडे गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जर मंत्रीमंडळात बसून काही मंत्री जर परस्पर महिलांचा अपमान करणार असतील, महिलांना अपमानास्पद वागणूक करणार असतील, अगदी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळेंबाबत अपशब्द वापरणाऱ्यांपासून ते कल्याणच्या एका चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमापर्यंत जे यांना वाचवण्याचं काम करत आहेत. ते लोक जर मंत्रीमंडळात खुर्च्यांवर बसलेले असतील तर महाराष्ट्रीची नैतिकता शिल्लक आहे की नाही, शिंदे सरकारला हा आमचा प्रश्न आहे.”
याशिवाय “जर शिंदे सरकारकडे थोडी जरी नैतिकता असती तर या २४ तासांमध्ये राजीनामे झाले असते. परंतु अद्यापही ते राजीनामे झालेले नाहीत. म्हणून आम्हाला राज्यपालांना इथे भेटायला यावं लागलं. त्यांना सांगावं लागलं की तुम्हाला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर बसवलं ते कशासाठी? जर महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात काही भ्रष्टाचारी, गुन्हेगार प्रवृत्तीचे आणि काही महिलांना अत्यंत हीन वागणूक देणारे मंत्री जर बसले असतील तर त्यांना त्या खुर्च्यांवर राहण्याचा अधिकार नाही आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जर ते सामर्थ्य नसेल. ते जर कटपुतलीसारखे बसून कारभार करत असतील, तर आमचं राज्यपालांना सांगणं होतं की, मंत्रीमंडळातील या मंत्र्यांचे ताबडतोब राजीनामे घ्या आणि राजीनामे दिले नाहीतर त्यांची हकालपट्टी करा. या महाराष्ट्रातील महिला ही सर्वसामान्य, गरीब, दुबळी अशी महिला नाही. ती या सावित्रीची लेक आहे आणि ती हा महाराष्ट्र पेटवून ठेवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही.” असंही विद्या चव्हाण यांनी सांगितले.
याचबरोबर “ताबडतोब राजीनामे घ्या तरच तुमची इज्जत राहील, नाहीतर तुम्हाला या महिला सुखाने जगू देणार नाहीत. महिलाबाल कल्याण खात्यासाठी सुद्धा यांच्याकडे महिला मंत्री नाहीत. रविंद्र चव्हाण, अब्दुल सत्तार आणि सुषमा अंधारेंचा अपमान करणारे गुलाबराव पाटील या तिघांचाही राजीनामा आम्हाला हवा आहे. नाहीतर आम्ही महिला सक्षम आहोत, संपूर्ण महाराष्ट्र जागृत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.” असा इशाराही यावेळी विद्या चव्हाण यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.