मुंबई : राज्यात सत्ताबदल होऊन भाजपप्रणीत सरकार स्थापन होताच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे म्हणजेच मुंबै बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी अचानक पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदांसाठी ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार आहे. मजूर म्हणून अपात्र ठरलेले विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे पुन्हा अध्यक्ष होतात की गेल्या वेळी पराभूत झालेले भाजप नेते प्रसाद लाड यांच्या गळय़ात अध्यक्षपदाची माळ पडते हे स्पष्ट होणार आहे.
मुंबै बॅंकेत एकूण २१ संचालक आहेत. दरेकर मजूर म्हणून अपात्र ठरल्याने सध्या २० संचालक आहेत. या संचालकांमध्ये सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर, शिल्पा सरपोतदार हे सेनेचे संचालक आहेत. सेनेसह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संचालकांची संख्या मिळून १० इतकी होते. त्यामुळे आणखी एक मत ज्याला मिळेल तो अध्यक्ष होईल. गेल्या वेळी सेनेचे घोसाळकर यांचा पराभव झाला होता. भाजपची सत्ता असल्याने भाजपचा अध्यक्ष बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न असल्याचे कळते.