विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून पेच निर्माण झाला आहे. ऋतुजा या मुंबई महानगरपालिकेत कर्मचारी असून त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय त्यांना निवडणुकीचा अर्ज भरता येणार नाही. मात्र त्यांचा राजीनामा मंजूर करू नये याकरीता शिंदे गटाने आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर दबाव टाकला असल्याचे समजते.
हेही वाचा >>>पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढील अडचणी वाढतच आहेत. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून महाविकास आघाडीने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. मात्र ऋतुजा या मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरीतील के पूर्व कार्यालयात कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. मात्र आता त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून शिंदे गटाने थेट आयुक्तांवर दबाव टाकला असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
हेही वाचा >>>“आमची मशाल ४० मुंडक्यांच्या रावणाला…”; मनिषा कायंदेंची शिंदे गटावर जोरदार टीका
कुरघोडीचे राजकारण करत शिंदे गटाने शिवसेनेला निवडणुकीच्या आधीच खिंडीत गाठले आहे. दरम्यान, ऋतुजा यांचा राजीनामा मंजूर व्हावा याकरिता शिवसेनेनेही सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात शिवसेनेचे काही पदाधिकारी ठाण मांडून बसले होते.दरम्यान, महानगरपालिकेच्या सेवाशर्ती नियमावली १९८९ नुसार एखाद्या व्यक्तीला स्वेच्छानिवृत्ती हवी असेल तर तीन महिने आधी नोटीस द्यावी लागते आणि राजीनामा द्यायचा असेल तर एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. एक महिन्याची नोटीस नाही दिली, तर एक महिन्याचे मूळ वेतन जमा करावे लागते असा उपनियम आहे. तसेच आयुक्त आपल्या अधिकारात परवानगी देऊ शकतात. मात्र ऋतुजा लटके यांनी ३ ऑक्टोबरला राजीनामा दिला असून एक महिन्याचा कालावधी पूर्ण न केल्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>>रिक्षा, टॅक्सी मीटरमधील बदलास आजपासून सुरुवात
दरम्यान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी के पूर्व विभागातून ना हरकत मिळवली असून मूळ वेतनाची ६७ हजार ५९० रुपये ही रक्कम महानगरपालिकेच्या कोषागारात भरण्यात आल्याचे असल्याचे समजते. मात्र ऋतुजा यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.