मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह जे. जे. रुग्णालयातील नऊ डॉक्टरांनी बुधवारी तडकाफडकी राजीनामे दिले. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. जे. जे. रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्यांवर गंभीर आरोप करत डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. यावरून डॉ. सापळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली.
“मी या संस्थेची विद्यार्थीनी आहे, या संस्थेतच शिकले आहे. बालरोग तज्ज्ञ आहे. एक लहान मुल अर्धातास तरी थंड किंवा गरम पडल्यावर काय होऊ शकतं हे मला माहितेय. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होईल, अशी कोणतीच गोष्ट माझ्याकडून होणार नाही. या आरोपांबद्दलतथ्य असल्याचं कारणच नाही”, असं अधिष्ठाता डॉ.सापळे म्हणाल्या.
“विद्यार्थी माझ्याकडे आले. मी शासकीय अधिकारी आहे. शासकीय अधिकाऱ्यांना फार सोपं असतं की महाराष्ट्र सेवा नियमांप्रमाणे तक्रार आली की त्याची शहानिशा करावी लागते. तक्रारादारांना मी आणि उपाधिष्ठांनी बोलावलं. शासकीय नियमानुसार चौकशी समितीची स्थापना केली. त्यात उपाधिष्ठाता, महिला अध्यापक आहेत. त्यांचा अहवाल आला. हा अहवाल गोपनीय असल्याने अहवालातील बाबी मी सांगू शकत नाही. परंतु, त्यातील दोन गोष्टी माझ्या स्तरावर करण्यासारख्या होत्या, त्या मी केल्या”, असंही स्पष्टीकरण त्यांनी पुढे दिलं.
“आस्थापनेत नसतानाही एक व्यक्ती रुग्णालयात येते. रुग्णांना पाहते, ऑपरेशन करतेय. याप्रकरणी प्राध्यापक विभागाच्या प्रमुखांना विचारणा करण्यात येणार आहे. कोणत्या आदेशाने, निर्देशाने किंवा कोणत्या कारणाने ती व्यक्त येथे येऊन रुग्ण पाहतेय? यात काही चूक आढळली तर वरिष्ठांना कळवून विनंती केली जाईल”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा >> जे. जे. रुग्णालयात राजीनामासत्र; ‘मार्ड’च्या आरोपांनंतर डॉ. लहाने, डॉ. पारेख यांच्यासह इतर आठ डॉक्टरांचा पदत्याग
राजीनाम्यांची यादी आली नाही
“राजीनामांची यादी माझ्याकडे आलेली नाही. माध्यमातून आलेल्या वृत्तातूनच मला राजीनाम्याविषयी कळलं. यानुसार राजीनामा दिलेल्यांमध्ये एकच फुल टाईम अध्यापक आहेत, डॉ.रागिणी पारेख. बाकी सगळे मानसेवी अध्यापक आहेत. या मानसेवी अध्यापकांना नॅशनल मेडिकल कमिशनचं व्हॅलिडेशन नसतं. सायली लहाने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. त्यांची नियुक्ती आयुक्त करतात. त्यामुळे त्यांचा राजीनामा आयुक्तांकडे जाईल. डॉ. लहाने जे. जे चे अधिष्ठाता आणि माजी संचालक होते. पण आजच्या क्षणाला ते आस्थापनेवर नाहीत. त्यांचं वेतन किंवा मानधन अलिबाग मेडिकल कॉलेजमधून देण्यात येईल, असं त्यांच्या नेमणुकीच्या आदेशात आहे. लहानेंचा आस्थापनेशी अर्थाअर्थी संबंध नाही”, असंही डॉ.सापळे यांनी पुढे स्पष्ट केलं.
नेमकं प्रकरण काय?
डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमाचे उल्लंघन करीत असून, निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यापासून दूर ठेवणे, शैक्षणिक अनियमितता, शैक्षणिक आणि संशोधन उपक्रम, निवासी डॉक्टरांवर अश्लील भाषेत टिप्पणी आदींमुळे जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. डॉ. पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने यांची बदली करावी, तसेच आवश्यक पदांवर प्राध्यापकांची लवकरात लवकर भरती करावी, अशा मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या आहेत.
डॉक्टरांनी फेटाळले आरोप
“आमच्याकडे सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांनी २२ तारखेला त्यांना शस्त्रक्रिया करायला दिल्या जात नाहीत म्हणून अधिष्ठातांकडे तक्रार केली. पण आमच्याकडे तीन वर्षं शिकलेल्या डॉक्टरांनी लिहून दिलेलं आहे की त्यांना सर्व काही शिकवलेलं आहे. आम्ही गेली ३० वर्षं काम करत आहोत. त्यामुळे ३ वर्षं किंवा ३० वर्षं काम करणाऱ्या लोकांवर विश्वास न ठेवता सहा महिन्यांपूर्वी आलेल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून अधिष्ठात्यांनी त्यांची चौकशी केली. आम्हाला चौकशीसाठी न बोलवताच एकतर्फी रिपोर्ट पाठवला”, असं तात्याराव लहाने म्हणाले.
कोणी कोणी दिले राजीनामे?
‘मार्ड’ने केलेले आरोप खोटे असल्याचा दावा करीत डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्याचबरोबर विभागातील अन्य आठ डॉक्टरांनीही राजीनामा दिला आहे. त्यात डॉ. शशी कपूर, डॉ. दीपक भट, डॉ. सायली लहाने, डॉ. प्रीतम सामंत, डॉ. स्वरांजित सिंग भट्टी, डॉ. आश्विन बाफना आणि डॉ. हमालिनी मेहता यांचा समावेश आहे.