संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : :नवरात्रोत्सवाच्या काळात राज्यातील महिलांच्या सर्वागिण आरोग्य तपासणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या संकल्पनेअंतर्गत या काळात १८ वर्षांवरील साडेतीन कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.

प्रामुख्याने घरातील स्त्री आरोग्यदृष्टय़ा सशक्त असेल तर घर सुरक्षित ही संकल्पना घेऊन नवरात्रोत्सवाच्या काळात ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून आरोग्य विभागाबरोबरच महापालिका, आदिवासी तसेच महिला व बाल विकास विभागाची मदत घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. राज्यातील आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये तसेच अंगणवाडी केंद्रात यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार असून आशा कार्यकर्त्यां तसेच अंगणवाडी सेविकांची मदत यासाठी घेण्यात येणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आशा स्वयंसेविकांना मदत करण्याचे आवाहन एका पत्राद्वारे केले आहे.

२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमात लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. २६ सप्टेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या किमान एका रुग्णालयात एकाचवेळी आरोग्य व दंत शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांवर सोपविण्यात आली आहे. सकाळी नऊ ते दुपारी दोन अशी या शिबिराची वेळ असून स्त्रीरोगतज्ज्ञांसह खाजगी डॉक्टरांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. प्रामुख्याने गर्भवती महिला तसेच नवजात मातांच्या सर्वागिण आरोग्यतपासणी करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक, उपचारात्मक सुविधा

* अतिदुर्गम भागात प्रामुख्याने आदिवासी क्षेत्रात आरोग्य विभागाच्या १८२ भरारी पथकातील डॉक्टरांच्या माध्यमातून पाडय़ावर तसेच वस्तींमध्ये जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

* राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत असलेल्या अडीच हजार डॉक्टरांवर गावागावात जाऊन महिलांचे समुपदशन करणे तसेच आरोग्य शिबिरांना महिला उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

* गावागावातील अंगणवाडी केंद्रात आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने यासाठीचा कृती आराखडा तयार केला जणार आहे.

* नवरात्रोत्सवातील तीन दिवस हे जास्तीतजास्त गर्भवती महिलांच्या सोनोग्राफी चाचणीसाठी देण्यात येणार आहेत. महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या व तपासणी या काळात करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Story img Loader