मुंबई : आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असलेली मुंबई ही स्वप्ननगरी आहे. ती स्वच्छ व सुंदरच असली पाहिजे. त्यामुळे मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांबरोबरच विविध बाराशे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. केंद्र सरकारने सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
पूर्व व पश्चिम उपनगरांतील प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलात झालेल्या सोहळय़ात डिजिटल कोनशिलेचे अनावरण करून करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अॅड.आशीष शेलार, मुंबई महापालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल उपस्थित होते.
मुंबईतील सुशोभीकरणाची कामे झाल्यानंतर शहर सुंदर ठेवण्याची जबाबदारी मुंबईकरांची आहे. मुंबईचा विकास करण्यासाठी अनेक पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे फायदे सर्वसामान्य नागरिकांना होणार आहेत. मुंबईत चांगल्या दर्जाचे रस्ते निर्माण करणे व स्थानिक तरुणांना रोजगार निर्माण करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावर्षी जी-२० परिषदेच्या आयोजनाचा मान आपल्या देशाला मिळाला आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. यानिमित्ताने मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये विविध बैठका होणार आहेत. या बैठकांसाठी जगभरातून येणाऱ्या मान्यवर प्रतिनिधींसमोर राज्याचे ब्रँडिंग करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सामाजिक परिवर्तनाची सुरुवात – फडणवीस
सामाजिक परिवर्तनाची सुरुवात मुंबईचा कायापालट या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत भिंती सुशोभित करणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, झोपडपट्टय़ांमध्ये दुप्पट निधी देऊन सुमारे वीस हजार शौचालये बांधणे आणि ती कायम स्वच्छ ठेवण्यासाठी धुलाई यंत्रे देणे व तेथे प्रकाशव्यवस्था ठेवणे, आदी प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. चहल यांनी प्रास्ताविक केले, तर अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी आभार मानले.