प्राजक्ता कदम

गेल्या काही वर्षांपासून सदोष उद्वाहनामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. यासाठी कुणाला दोषी धरायचे? उद्वाहन तयार करणारे, विनापरवाना कार्यान्वित ठेवणारे, देखभाल न करणारे की ते निष्काळजीपणे वापरणारे? हा मुख्य प्रश्न असतो. उपनगर जिल्हा ग्राहक मंचाने आपल्या निकालाद्वारे त्याचे उत्तर दिले आहे. उद्वाहन वापरणाऱ्यांचा अपवाद वगळता सगळ्यांना मंचाने दोषी धरले आहे.

धर्मा आणि सुमन मदाने यांनी कांदिवली येथील ११ मजली आकृती गोल्डन पॅलेस सहकारी गृहसंस्थेमध्ये सातव्या मजल्यावर घर घेतले होते. घराचा ताबा मिळाल्यावर आपल्या दोन लहान मुलांसह मदाने दाम्पत्य तिथे वास्तव्यासाठी आले. ज्या इमारतीत मदाने दाम्पत्य राहत होते तिच्या उद्वाहनाच्या दाराबाहेर ‘व्हिजन पॅनेल’साठी थोडीशी जागा होती. त्याला संरक्षक काच बसवण्यास आली नव्हती. शिवाय उद्वाहनातील दिशादर्शकही कार्यरत नव्हते. २५ जून २००३ रोजी सुमन यांना बाहेर जायचे होते. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर त्या उद्वाहनजवळ आल्या. बराच वेळ उद्वाहन आले नाही म्हणून ते कार्यरत आहे की नाही हे पाहण्यासाठी सुमन यांनी उद्वाहनाच्या ‘व्हिजन पॅनेल’मध्ये डोकं घालून चाचपणी करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी उद्वाहन अचानक खालच्या दिशेने आले आणि ते त्यांच्या डोक्यावर आदळले. गंभीररीत्या जखमी झालेल्या सुमन यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

पत्नीच्या अशा अचानक आणि दुर्दैवी मृत्यूने धर्मा मदाने पूर्णपणे खचून गेले होते. पत्नीशिवाय दोन लहानग्यांचा संगोपन कसे करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. काही काळाने पत्नी जाण्याच्या दु:खातून मदाने सावरले. त्यानंतर या प्रकाराविरोधात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार मंचाकडे धाव घेतली आणि विकासक, उद्वाहन निर्माता, इमारतीचे स्थापत्य विशारद, सोसायटी तसेच तिचे अध्यक्ष-सचिवांविरोधात संयुक्त तक्रार नोंदवली. उद्वाहन निकृष्ट दर्जाचे आहे आणि निष्काळजीपणामुळे अपघात झाला, असा दावा त्यांनी तक्रारीत केला. त्याचप्रमाणे सुमन यांच्या मृत्यूसाठी १७ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणीही केली.

मदाने यांच्या तक्रारीला सगळ्या प्रतिवादींनी उत्तर दिले. त्यात उद्वाहन सदोष आहे याची पूर्ण जाणीव सुमन यांना होती. असे असतानाही सुमन यांनी ‘व्हिजन पॅनेल’मध्ये डोके घातले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असा दावा प्रतिवाद्यांनी केला. तसेच सुमन याच या अपघातासाठी सर्वस्वी जबाबदार असल्याचे सांगत त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

परंतु उद्वाहनाचे ‘व्हिजन पॅनेल’ हे संरक्षक काच न बसवता असेच खुले ठेवणे हेच मुळात सुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे, याकडे मदाने यांच्या वकिलाने सुनावणीच्या वेळी मंचाचे लक्ष वेधले. हे विचारात घेतले तर उद्वाहनाचे ‘व्हिजन पॅनेल’ हे संरक्षक काच न बसवता असेच खुले ठेवण्यात आले आहे आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो याची जाणीव सगळ्या प्रतिवाद्यांना होती. त्यानंतरही उद्वाहनाचा वापर न करण्याबाबत रहिवाशांना सूचना देण्यात आली नाही. एवढेच नव्हे, तर उद्वाहन वापरण्यासाठीची परवानगीही घेण्यात आलेली नसल्याची बाब मदाने यांच्या वकिलांनी मंचाच्या निदर्शनास आणून दिली.

हा युक्तिवाद मंचाने ग्राह्य़ मानला.  ३० ऑक्टोबर २०१८ रोजी मदाने यांच्या तक्रारीवर निकाल देताना वापरकर्त्यांच्या निष्काळजीला दोष देत सदोष उद्वाहन विनापरवाना कार्यान्वित ठेवणारे आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत, असा निर्वाळा मंचाने दिला. सगळेच प्रतिवादी सुमन यांच्या मृत्यूसाठी दोषी आहेत, असे नमूद करीत १५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मंचाने दिले. भरपाईची रक्कम देण्यास विलंब झाला, तर ९ टक्के व्याजाने ही रक्कम द्यावी. त्याचप्रमाणे मदाने यांना कायदेशीर लढाईसाठी आलेल्या खर्चासाठी १० हजार रुपये देण्याचे आदेशही मंचाने दिले.

Story img Loader