सार्वजनिक गणेशोत्सवापाठोपाठ आता पालिकेने घरगुती गणपतींबाबत धोरण निश्चित केले असून गणेश आगमन, विसर्जनाबाबत कडक नियम जारी केले आहेत. लहान मुलांना विसर्जनस्थळी नेण्यास मज्जाव केला आहे. करोनाच्या प्रादुर्भावाला आमंत्रण देणारी कृती करणाऱ्याविरुद्ध साथरोग कायदा १८९७, आपत्ती निवारण कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८६० कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

मुंबईमध्ये तब्बल दोन लाखांहून अधिक घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठा केली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरगुती गणपतीची आगमन आणि विसर्जन मिरवणुकीस परवानगी नाकारण्यात आली आहे. आगमनासाठी केवळ पाच व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांना मुखपट्टी, सॅनिटायझर, सामाजिक अंतर आदी नियमांची सक्ती करण्यात आली आहे.

गणपतीचे दर्शन घेण्यासाठी घरी येणाऱ्या भाविकांना मुखपट्टी वापरण्याचा आग्रह करावा. तसेच त्यांच्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्याची सूचना पालिकेने केली आहे.

विसर्जनाबाबतही पालिकेने कडक नियम केले आहेत. भाविकांनी शक्य असल्यास गणेश विसर्जन माघी गणेशोत्सवात किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात करावे. तोपर्यंत गणेशमूर्ती घरीच ठेवावी. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरीच करावे. ते शक्य नसल्यास गणपतीची आरती विसर्जनस्थळाऐवजी घरीच करावी किंवा कृत्रिम विसर्जनस्थळी गणेश विसर्जन करावे. विसर्जनाच्या वेळी केवळ पाच व्यक्तींनी उपस्थित राहावे. नैसर्गिक विसर्जनस्थळी जाऊ नये, चाळीतील, इमारतीतील घरगुती इमारतींची एकत्रित विसर्जन मिरवणूक काढू नये, लहान मुलांना विसर्जनस्थळी घेऊन जाऊ नये, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गणेशोत्सव काळातही प्रतिबंधित क्षेत्रातील घरे, इमारतींमधील रहिवाशांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader