लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : जागतिक मानवी केसांच्या निर्यातीत भारत आघाडीवर आहे. पण, केंद्र सरकारने नुकतीच एक अधिसूचना काढून प्रक्रिया न केलेले केस निर्यात करण्यावर निर्बंध लागू केले आहेत. प्रक्रिया न केलेले केस किमान ६५ डॉलर म्हणजे सुमारे साडेपाच हजार रुपये किलोपेक्षा कमी दराने निर्यात करू नयेत, असे आदेशात म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या परकीय व्यापार महासंचनालयाने (डीजीएफटीआय) १४ फेब्रुवारीला अधिसूचना काढून प्रक्रिया न केलेल्या केसांची निर्यात किमान ६५ डॉलर म्हणजे सुमारे साडेपाच हजार रुपये प्रतिकिलो पेक्षा कमी दराने करता येणार नाही, असे म्हटले आहे.

जागतिक केसांच्या बाजारपेठत प्रक्रिया केलेल्या केसांच्या निर्यातीत ५४ टक्के आणि प्रक्रिया न केलेल्या केसांच्या निर्यातीत ९३ टक्के वाटा भारताचा आहे. चीन भारतीय केसांचा सर्वांत मोठा आयातदार आहे. चीनला प्रक्रिया केलेल्या केसांची निर्यात जास्त होते, तर प्रक्रिया न केलेल्या केसांची निर्यात म्यानमारला जास्त होते. प्रक्रिया न केलेल्या जागतिक निर्यातीत भारताचा वाटा ९३ टक्के आहे, त्यापैकी ९९ टक्के केस म्यानमारला जातात.

चालू आर्थिक (२०२४ – २५) वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर, या आठ महिन्यांत १२३९.६ लाख डॉलर किंमतीच्या केसांची निर्यात झाली आहे. तर गत आर्थिक वर्षात (२०२३ – २४) १२४० लाख डॉलर किंमतीची निर्यात फक्त म्यानमारला झाली आहे. चीन, म्यानमार, कंबोडिया, व्हिएतनामला सर्वांधिक निर्यात होते.

तस्करी वाढल्याने निर्बंध

देशातून चीन आणि म्यानमारला मोठ्या प्रमाणावर मानवी केसांची तस्करी होत असल्याचा अहवाल समारे आल्यानंतर देशी उद्योगांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये केस प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. त्या नंतर आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि तमीळनाडूचा नंबर लागतो. देशभरात घरोघरी फिरून आणि प्रामुख्याने दक्षिणेतील देवस्थानांमधून मानवी केसांचे संकलन होते. मंदिरांमधून संकलित होणारे केस चांगल्या दर्जाचे, तर घरोघरी फिरून जमा केलेले केस कमी दर्जाचे असतात.

प्रक्रिया न केलेल्या केसांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होऊ लागली होती. त्यामुळे देशातील केस प्रक्रिया उद्योगांना केसांचा तुटवडा जाणवत होता. प्रक्रिया केलेल्या केसांना सरासरी आठ हजार रुपये किलो, तर प्रक्रिया न केलेल्या केसांना सरासरी साडेचार रुपये दर मिळत होता. निर्बंधांमुळे प्रक्रिया न केलेल्या केसांची निर्यात कमी होईल, त्याचा फायदा प्रक्रिया उद्योगाला होऊन केसांचे मूल्यवर्धन होईल, असे मत निर्यात सल्लागार अक्षय राणे यांनी व्यक्त केले.

Story img Loader