मुंबई : दिवाळी, छटपूजेसारख्या सणासुदीच्या काळात रेल्वेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले होते. मात्र, सणासुदीचा काळ संपल्याने ९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळी आणि छटपूजेसाठी मुंबईतील परप्रांतीय उत्तर भारतातील आपल्या मूळ गावी गेले. सामान्य तिकीटधारकांची संख्या तिप्पटीने वाढल्यामुळे २७ ऑक्टोबर रोजी पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस येथे चेंगराचेंगरीची घटना घडली.
हेही वाचा >>> Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
गर्दीचा भार विभाजित करण्यात यश न आल्याने रेल्वे प्रशासनाचा अनियोजित कारभार दिसून आला. त्यामुळे, प्रवाशांची धक्काबुक्की होऊन, त्याचे स्वरूप चेंगराचेंगरीत झाले. यात १० जण जखणी झाले. या पार्श्वभूमीवर, त्याच दिवशी मध्य व पश्चिम रेल्वेने फलाट तिकीट विक्री बंद केली. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई रोड, वापी, वलसाड, उधना, सुरत या स्थानकात ८ नोव्हेंबरपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्बंधामधून ज्येष्ठ नागरिक, वैद्याकीय गरज असलेल्या प्रवाशांना सूट दिली गेली होती. आता दिवाळी आणि छटपूजा पार पडल्याने ९ नोव्हेंबरपासून प्रवाशांना पुन्हा फलाट तिकीट देणे सुरू करणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.