लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : सध्या मोबाइलवर यूट्युब, इन्स्टाग्रामवरील रिल पाहण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. कार्यालयात काम करतानाही रिल पाहण्यात अनेक नागरिक दंग असतात. त्यामुळे कामावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन कामा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मोबाइलचा वापर करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. मोबाइलचा वापर फक्त शासकीय कामासाठी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यूट्युब, फेसबूक, इन्स्टाग्राम यांसारख्य समाज माध्यमांवर चित्रफिती, तसेच रिल पाहण्यात नागरिक बराचसा वेळ वाया घालवतात. त्याचा परिणाम कामावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोग्य सेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा असून त्यात कोणताही हलगर्जीपणा होऊ नये यासाठी सुरक्षेची काळजी म्हणून कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांनी मोबाइलवर यूट्युब, इन्स्टाग्राम पाहण्यात वेळ घालवू नये, यासाठी कामा रुग्णालयच्या आवारामध्ये मोबाइलच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयाच्या आवारात मोबाइलचा वापर फक्त शासकीय कामकाजासाठी व अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा-काळाघोडा महोत्सवाच्या धर्तीवर बीकेसीत भरणार कला महोत्सव
मोबाइल हे माहिती आदानप्रदान करण्याचे आणि संवाद साधण्याचे साधन आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी कर्तव्यावर असताना यूट्युब, इन्स्टाग्रामवरील रिल्स व अन्य चित्रफिती पाहू नयेत. तसेच रुग्णालयाच्या आवारात मोबाइलचा गैरवापर करताना आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरूद्ध शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आला आहे.