पेट्रोल, डिझेल महागाईच्या नोकरदारांना थेट झळा; पर्यायी साधने नसल्याने खासगी वाहनांतूनच प्रवास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : रेल्वे प्रवासावर र्निबध आणि बसमध्ये होणारी गर्दी, दिरंगाई यामुळे खासगी वाहनाने प्रवास करण्याकडे बहुतांश नोकरदारांचा कल वाढला आहे. परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंधनदरांमुळे हा प्रवास डोईजड होऊ लागला आहे. पगारापेक्षा प्रवासखर्च अधिक अशी अवस्था झाल्याची प्रतिक्रिया अनेक वाहनधारक म्हणू लागले आहेत. अशा महागाईत जगणे कठीण बनले आहे, अशी व्यथा नोकरदार मंडळी व्यक्त करत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लावले असले तरी, खासगी कंपन्या, उद्योग, मोठमोठे व्यवसाय यांचे काम थांबलेले नाही. अत्यावश्यक सेवांप्रमाणेच अनेक खासगी उद्योगांनाही र्निबधांतून सूट देण्यात आली आहे. मात्र, या नोकरदारांना रेल्वे प्रवासाची परवानगी नाही. परिणामी बहुतांश कर्मचारी खासगी दुचाकी, चारचाकी वाहनाने कामावर ये-जा करत आहेत. इंधन दरांत होणाऱ्या सततच्या वाढीमुळे त्यांचा हा प्रवास दिवसेंदिवस महाग होऊ लागला आहे.

‘काही महिन्यांपूर्वी आठवडय़ाला २५० रुपयांचे पेट्रोल लागायचे, आता त्यासाठी ५०० रुपये मोजावे लागत आहेत. प्रवासाचा खर्च वाढला, परंतु पगार तेवढाच आहे. किंबहुना करोनामुळे नोकरी टिकविणे कठीण झाल्याने पगारात कपात करण्यात आली आहे. असेच सुरू राहिले तर घरात बसायची वेळ येईल,’ अशी व्यथा चुनाभट्टी ते परळ दरम्यान प्रवास करणाऱ्या एका खासगी कंपनीत काम करणारे सागर गायकवाड यांनी मांडली. अनेक नोकरदार बोरिवली ते चर्चगेट किंवा ठाणे, नवी मुंबईतून दक्षिण मुंबई असा प्रवास स्वत:च्या वाहनातून करत आहेत. परंतु पेट्रोलचे दर शंभरीपार गेल्याने हा प्रवास त्यांना परवडेनासा झाला आहे.

फिरतीवरील कर्मचाऱ्यांची दैना

कुरियर सेवा, वस्तू-जेवण घरपोच देणाऱ्या कंपन्या आणि इतर बऱ्याच आस्थापनांतील कर्मचारी फिरतीचे काम करतात. कंपनीच्या कामांसाठी त्यांना मुंबईभर फिरावे लागते. अशा कर्मचाऱ्यांची इंधन दरवाढीने वाताहत केली आहे. कंपनीकडून प्रवासासाठी दिलेली रक्कम इंधन दरवाढीमुळे अपुरी पडत आहे. ‘सध्या दिवसाला १०० रुपयांचेही पेट्रोल पुरत नाही. तुटपुंजे वेतन आणि त्या इंधनासाठी पदरमोड करणे परवडणारे नाही,’ असे घरपोच वस्तू पोहोचविण्याचे काम करणाऱ्या गणेश गुरव यांनी सांगितले.

पंप कर्मचाऱ्यांवर आगपाखड

पेट्रोलपंपावरही इंधन दरवाढीच्या चर्चाना उधाण आले आहे. ‘दिवसातून शेकडो लोक इंधनाचे दर कधी कमी होणार, असे आम्हालाच विचारतात. काही तर आमच्यासमोर शिवीगाळ करून जातात. पण आम्ही त्यांना काय उत्तर देणार,’ असे एका पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याने सांगितले.

ठाणे, नवी मुंबईसह अनेक शहरांत पेट्रोलचे दर लिटरमागे शंभर रुपयांवर पोहोचल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.