‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ मेट्रो’ला जोडणाऱ्या महावीर नगर मेट्रो स्थानक – पॅगोडा, गोराई दरम्यानचा रोप वे प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पासाठी तयार केलेल्या निविदेचा प्रस्ताव यापूर्वी नामंजूर झाला होता. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द झाली होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यासाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच रोप वेसाठी नवीन निविदा विनंती प्रस्ताव तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
हेही वाचा- मुंबई – ठाणेकरांची प्रतीक्षा संपणार, कोकण मंडळाच्या चार हजार घरांच्या सोडतीची जाहिरात पुढील आठवड्यात
‘मेट्रो २ अ’मुळे पश्चिम उपनगरातील प्रवास वेगवान होणार असून ‘मेट्रो २ अ’चा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी एमएमआरडीएने मेट्रो प्रकल्प रोप वेला जोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महावीर नगर मेट्रो स्थानक ते गोराई आणि मालाड ते मार्वे असा अंदाजे १० किमी लांबीचा रोप वे बांधण्यात येणार आहे. दोन टप्पात रोप वे प्रकल्प राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात महावीर नगर मेट्रो स्थानक ते गोराई असा ७.२ किमीचा रोप वे उभारण्यात येणार आहे. मात्र ‘मेट्रो २ अ’चा पहिला टप्पा सुरू झाला असून आता काही दिवसातच दुसरा टप्पाही सुरू होणार असतानाच हा रोप वे प्रकल्प अजूनही कागदावरच आहे.
हेही वाचा- मुंबईत ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’त पावणेदोन महिन्यात दोन लाख रुग्णांची तपासणी!
एमएमआरडीएने ७.२ किमी लांबीच्या रोप वेच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली असून या कामासाठी दोन निविदा आल्या होत्या. मात्र या निविदा अंतिम करून ४० वर्षांसाठीचे कंत्राट देण्यासंबंधीचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मार्च २०२२ मध्ये नामंजूर करण्यात आला आणि प्रकल्प बारगळला.
हेही वाचा- मुंबई : रखडलेल्या ३८ प्रकल्पांबाबत म्हाडाकडे कृती योजनेचा अभाव
या प्रकल्पासाठी केवळ दोन निविदा सादर झाल्या होत्या. यातून एका कंपनीची निवड करून त्यांना ४० वर्षांसाठी कंत्राट दिले जाणार होते. मात्र कंत्राट अंतिम झाल्यानंतर वर्षभरात कामाला सुरुवात करणे करारानुसार बंधनकारक होते. एका वर्षात काम सुरू झाले नाही तर एमएमआरडीएला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार होते. मुळात या प्रकल्पासाठी पर्यावरणासह अनेक प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. वर्षभरात या सर्व परवानग्या घेऊन कामास सुरुवात करणे अशक्य असल्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निविदा रद्द करण्यात आली. मात्र निविदा रद्द करतानाच लवकरच फेरनिविदा काढण्याचे आदेश कार्यकारी समितीने त्यावेळी दिले होते. त्यानुसार आता रोप वेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एकूणच रखडलेला रोप वे येत्या काळात मार्गी लागण्याची शक्यता आहे.