लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : कारगिल युद्धानंतर जम्मू – काश्मिरमधील स्थिती फार स्फोटक झाली होती. गणवेशातील जवानांवर दगडफेक व्हायची, पेट्रोलिंग, रेकी सुरू असताना अचानक पाच-पन्नास लोकांचा जमाव जमा व्हायचा आणि आम्हाला अडवायचा. पोलीस, जवानांवरीस हल्ल्याच्या घटना नियमित घडायच्या, पण सध्या श्रीनगर, पहलगाममधील स्थितीत खूप बदल झाला होता, अशा आठवणी बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधून (बीएसएफ) निवृत्त झालेले जवान अनिल माने यांनी कथन केल्या.

मी २००१ ते २००५ या काळात जम्मू-काश्मिरमध्ये काम केले होते. त्यावेळी कारगिर युद्ध संपले होते. पण काश्मिर खोऱ्यातील वातावरण प्रचंड स्फोटक होते. तंगदार, कारगिल, बडगाम, झेलम नदीच्या किनाऱ्यावरील परिसरात वारंवार दहशतवाद्यांशी चकमकी होत होत्या. पण तेथील शत्रू हा समोर उभा असायचा. काश्मिरमधील पर्यटनस्थळे, गर्दीची ठिकाणे येथे बंदोबस्त करणे फार जिकीरीचे होते.

वैष्णवदेवी, श्रीनगर, पहलगाम, अमरनाथ यात्रा अशा ठिकाणी सुरक्षेवर तैनात असताना सामान्य नागरिकांच्या आडून दहशतवादी कधी हल्ला करतील हे सांगणे कठीण असायचे. पोलीस, जवानांवर दगडफेकीच्या घटना वारंवार घडायच्या. विशेष करून एखाद्या दहशतवाद्याचा माग घेताना, गस्तीवर असताना किंवात शोध मोहीम राबवत असताना अचानक पाच-पन्नास नागरिक जमा व्हायचे. ते दगडफेक करायचे, अशी स्थिती त्यावेळी काश्मिरात होती, असे माने यांनी सांगितले.

जोखमीची ड्युटी करावी लागायची

त्यावेळी आमच्या सात कंपन्या तैनात होत्या. प्रत्येक कंपनीत १३७ जवान होते. त्यातील एक कंपनी प्रशिक्षणात असायची. उर्वरित सहा कंपन्या सुरक्षेसाठी पोलिसांसोबत तैनात असायच्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्या कंपनीला जोखमीची ड्युटी करावी लागायची, असेही माने यांनी सांगितले. पर्यटनस्थळांवर एक हवालदार व तीन शिपाई सुरक्षेसाठी नियमित तैनात असायचे,असे माने यांनी सांगितले.

मूळचे सोलापूर तेथील नातेपुते गावातील रहिवासी असलेले माने यांना काश्मिरमधील विशेष करून श्रीनगर येथील नागरिकांकडून चांगला अनुभव आला. सामान्य नागरिकांना त्यांची रोजी-रोटी व शांतता हवी होती. पण त्या काळी दहशतवादी वारंवार बंदची हाक द्यायचे. त्याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावरही व्हायचा. पण दहशतवाद्यांच्या धाकामुळे त्यांनाही नाईलाजाने बंद पाळावा लागत होता. अशा दहशतीच्या वातावरणानंतर सध्या काश्मिरमधील स्थिती बऱ्यापैकी सामान्य झाली होती. पूर्वी ठप्प झालेला व्यापार, पर्यटन सुरू झाले होते. पहलगाम परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. निसर्ग सौदर्याने नटलेल्या या परिसरातील बहुसंख्य नागरिक पर्यटनावर अवलंबून आहेत. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो, असेही यावेळी माने यांनी सांगितले.