मुंबई : दिवसेंदिवस डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सायबर फसणुकीचे प्रकार वाढत आहेत. प्राप्तीकर विभागातून सेवानिवृत्त झालेल्या ७४ वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्ट करून त्यांच्या बँक खात्यातील २५ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचा प्रकार मुंबईत घडला. नरेश गोयल प्रकरणात महिलेचा सहभाग असल्याची भीती दाखवून आरोपींनी ही फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुरूवार, २ जानेवारी रोजी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तक्रारदार महिला २०११ मध्ये प्राप्तीकर विभागातून निवृत्त झाल्या असून सध्या त्या गोरेगाव येथे कुटुंबियांसोबत राहतात. त्यांना १२ नोव्हेंबर रोजी अनोळखी व्यक्तीचा दूरध्वनी आला. आपण क्रेडिटकार्ड विभागातून बोलत असून तुमच्या क्रेडिटकार्डवर अडीच लाख रुपये थकीत असल्याचे त्याने महिलेला सांगितले. याबाबत बंगळुरू येथे याचिका दाखल असून तुम्हाला तेथे यावे लागेल, असेही त्या व्यक्तीने सांगितले. मी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे मला येता येणार नाही, असे महिलेने त्याला सांगितले. त्यावर बंगळुरू सिटी पोलीस तुम्हाला दूरध्वनी करतील, असे त्याने सांगितले. त्यांना बंगळुरू सीटी पोलिसांच्या नावाने एक व्हिडिओ कॉल आला. तुमच्या खात्यातून दोन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे त्याने सांगितले. नरेश गोयल यांच्याकडे तुमच्या बँक खात्याचे पासबुक मिळाले असून तुम्हाला कोणत्याही क्षणी अटक होईल, अशी भीती तक्रारदार महिलेला घालण्यात आली. अटक टाळायची असेल, तर १० टक्के कमिशन भरावे लागेल, असेही महिलेला सांगण्यात आले.
हे ही वाचा… कुर्ला बस दुर्घटना चालकामुळेच, संजय मोरेच्या जामिनाला विरोध करताना पोलिसांचा न्यायालयात दावा
हे ही वाचा… मुंबईतील किमान तापमानात ४ अंशांनी घट
त्यानंतर सीबीआयच्या नावाने तक्रारदार महिलेला नोटीस पाठवण्यात आली. त्यात गोयल प्रकरणातील प्रमुख संशयीत असा त्यांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे त्या घाबरल्या. त्यांना आरोपीने नॅशनल सिक्रेट लॉनुसार घरातच अटक रहावे लागेल, यावेळी त्यांना कोणालाही काहीही सांगता येणार नाही, असेही महिलेला बजावण्यात आले. त्यामुळे महिलेने कोणालाही हा प्रकार सांगितला नाही. तसेच महिलेने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर २५ लाख रुपये हस्तांतरित केले. त्यावेळी त्यांना पाठवण्यात आलेल्या पावतीवर प्राप्तीकर आणि रिझर्व बँकेचे लोगो होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी सायबर पोलिसांच्या मदत क्रमांकावर दूरध्वनी करून तक्रार केली. त्यानुसार २ जानेवारी रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पैसे हस्तांतरित झालेल्या बँक खात्याच्या मदतीने पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.