मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव, कूपर आणि दंत महाविद्यालयातील संचालक, अधिष्ठाता आणि अध्यापकांचे सेवा निवृत्तीचे वय ६२ वरून ६४ करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. महानगरपालिका प्रशासनाने यासंदर्भातील परिपत्रक मंगळवारी जारी केले.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांतील संचालक, अधिष्ठाता आणि अध्यापक यांचे वय ६२ वरून ६४ करण्याचा निर्णय मंगळवारी महानगरपालिकेने परिपत्रकाद्वारे जाहीर केला. यामुळे महानगरपालिकेच्या सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय (केईएम रुग्णालय), टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय (नायर रुग्णालय), लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय (शीव रुग्णालय) आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय (कूपर रुग्णालय) आणि नायर दंत महाविद्यालय या पाच महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या अध्यापकांचे सेवा निवृत्ती वय हे ६२ वरून ६४ वर्ष करण्यात आले आहे.
हेही वाचा – दहशत माजविणारा गुंड वर्षभरासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध
दरम्यान, अध्यापकांचे सेवा निवृत्तीचे वय वाढवू नये, अशी मागणी महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटना, महानगरपालिका वैद्यकीय, दंत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट संस्था यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र पाठवून केली होती. राज्य शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापकांचे सेवा निवृत्तीचे वय ६४ वर्षे आहे, त्याच धर्तीवर महानगरपालिकेने हा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.