मुंबई : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात ओढ घेतलेल्या पावसाची पुन्हा रिमझिम सुरू झाली असून पाणीसाठ्यात किंचितशी वाढ झाली आहे. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही तलावांमध्ये सध्या ८९.०६ टक्के पाणीसाठा असून साठ्यात अद्याप ११ टक्के पाण्याची तूट आहे. सातही तलावांमध्ये सध्या १२ लाख ८८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात भरघोस वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीपातळी ‘जैसे थे’ होती. असे असले तरी दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे. मात्र तलावांतील पाणीसाठयात अद्यापही ११ टक्के तूट आहे. पावसाने दडी मारल्यास ही तूट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, बुधवारी दिवसभर ढगाळ हवामान राहील आणि काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षांतीलचा ३ ऑगस्टपर्यंतचा जलसाठा
वर्ष — ( दशलक्ष लिटर मध्ये) …..टक्केवारी
२०२२ – १२,८८,९८० …… ८९.०६ टक्के
२०२१ – ११,१९,८१५ …. ७७.३७ टक्के
२०२० – ५,०२,२४२ ….. ३४.७० टक्के