बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींची मागणी करणारे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची रीघ लागली होती. गेल्या वर्षीपासून उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती देण्याची पद्धत सुरू झाली असली यंदा प्रथमच या उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स आपापल्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांकडून तपासून घेऊन नंतर पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय बोर्डाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळेच निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या वाशी येथील कार्यालयात एकच गर्दी केली होती, अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी
दिली.
यंदा प्रथमच उत्तरपत्रिका आपापल्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांकडून तपासून घेऊन त्यावर त्यांचा अभिप्राय घेता येणार आहे. एखाद्या विषयाची उत्तरपत्रिका तपासल्यानंतर प्राध्यापकांनी पुनर्मूल्यांकनाची गरज व्यक्त केली तर लगेचच विद्यार्थ्यांनी अभिप्रायासह पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय बोर्डाने उपलब्ध करून दिली आहे.
विज्ञान शाखेच्या अनेक विषयांच्या पेपरसंदर्भात यंदा विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी असून त्यामुळेच निकालानंतर पहिल्याच दिवशी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. परिणामी ३ वाजेपर्यंतची मुदत असूनही बोर्डाने शुक्रवारी तीनऐवजी पाच वाजेपर्यंत संबंधित कामकाज करण्यासाठी खिडकी उघडी ठेवली, अशी माहिती पांडे यांनी दिली.
उत्तरपत्रिकांची झेरॉक्स प्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांतील प्राध्यापकांकडून तपासून घेऊन लगेच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत वाशी येथील बोर्डाच्या कार्यालयात स्वीकारले जात आहेत.

Story img Loader