बीड जिल्हय़ातील स्फोटाला ‘धार्मिक’ नव्हे तर वैमनस्याचा रंग असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर एकेकाळचे सख्खे मित्र कट्टर वैरी होऊन उगविलेल्या सुडाची ही कथा आहे. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचीही ही कहाणी आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी गावात गोपीनाथ तरकसे आणि आबा ऊर्फ मुंजाबा गिरी हे शेजारी राहणारे जिवलग मित्र. तरकसे आपल्या पत्नीशी बोलत असल्याने आबाच्या मनात संशयकल्लोळ निर्माण झाला. त्यातून या दोघांत वाद निर्माण झाला. त्यात सरपंचपदाच्या निवडणुकीत तरकसेचा भाऊ जिंकला आणि गिरी याने उभा केलेला उमेदवार पडल्याने आगीत तेलच ओतले गेले. त्या रागापोटी गिरी याने तरकसेचे घरच पेटवून दिले. या विरोधात तरकसे याने तक्रार दिल्यानंतर आबाला दलित अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. परिणामी, आबाने तीन महिने तुरुंगात घालवले. तुरुंगातून तो बाहेर आला तोच मुळी सुडाच्या भावनेने पेटून. त्याने तरकसेच्या विरोधात बायकोचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली. हा पण तुरुंगात जाईल, असा त्याचा समज होता. परंतु, विनयभंग हा जामीनपात्र गुन्हा असल्याने तरकसे तात्काळ जामिनावर सुटला. तेव्हापासून त्याने कट रचायला सुरुवात केली होती.
औरंगाबादच्या दहशतवादविरोधी पथकोचे (एटीएस) पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी सांगितले की, अशिक्षित गिरी याने सहा महिन्यांपूर्वीच हा कट रचला होता. गिरीने दिल्ली बनावटीचा अपर्णा रेडिओ विकत घेतला. विहीर खोदण्यासाठी ज्या डिटोनेटर्सचा वापर होतो, ते डिटोनेटर्स अवघ्या ५० रुपयांना त्याने विकत घेऊन ठेवले होते. तीन महिन्यांपूर्वी अंबाजोगाई येथून त्याने गोपीनाथ तरकसे याच्या नावाने एक मोबाइल विकत घेतला. या रेडिओमध्ये डिटोनेटर्स भरून एक पार्सल तयार केले. त्या पार्सलसोबत तरकसेच्या नावाने असलेले मोबाइल बिलही ठेवले. हे पार्सल बसमध्ये ठेवून मुंबईला पाठवले. त्याची अपेक्षा होती मुंबईत स्फोटके असलेला हा रेडियो पोलिसांना सापडेल आणि त्यातील मोबाइल बिलाच्या आधारे ते तरकसेला दहशतवादी ठरवून अटक करतील. परंतु हे पार्सल बसवाहक वामन िनबाळकर यांनी आपल्या घरी नेले आणि ती दुर्घटना घडली.    

‘व्हॉटस अ‍ॅप’मुळे आरोपी सापडला
स्फोटाची बातमी पसरताच एकच खळबळ उडाली. औरंगाबाद एटीएसने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. तेथे पोलीस हवालदार भीमराव पवार यांना बोटाच्या आकाराएवढा कागदाचा तुकडा सापडला. त्यात अंबाजोगाई २१/८ असे लिहिले होते. तसे सात आठ तुकडे गोळा करून त्यांनी त्याचे फोटो काढले. पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी ते फोटो ‘व्हॉटस अ‍ॅप’ या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवरून त्वरित अंबाजोगाईत वरिष्ठांना पाठवले. त्याआधारे अंबाजोगाईच्या ४०-५० मोबाइल विक्रेत्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. त्यापैकी एकाने आपल्या दुकानातून हा मोबाइल विकला गेल्याचे सांगितले. त्या पत्त्यावरून तरकसेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात आबा गिरी याने हा मोबाइल विकत घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा प्रकार घडकीस आला. या प्रकरणी राज्याच्या एटीएसचे प्रमुख राकेश मारिया, पोलीस उपमहानिरीक्षक अमितेश कुमार यांनी तपासात मार्गदर्शन केले. औरंगाबाद एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक गोरख जाधव, पोलीस हवालदार फडे, पवार, गरड, पगारे, सावंत आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Story img Loader