सहकार विभागाने केले ‘दोनाचे चार’!
संबंधित अधिकाऱ्यांकडून लंगडे समर्थन
महाराष्ट्रात एकूण जिल्हे ३५ असून त्यात बृहन्मुंबईतील शहर व उपनगर अशा दोन जिल्ह्य़ांचा समावेश आहे. सहकार विभागाने मात्र दोन अतिरिक्त जिल्हा उपनिबंधकांची जादा कार्यालये उघडून मुंबईतील दोन जिल्ह्याचे चार जिल्हे केले आहेत. मुंबईतील कामाचा व्याप लक्षात घेता जिल्हा उपनिबंधकांची दोन अतिरिक्त कार्यालये स्थापन करावी लागली आहेत, असे समर्थन सहकार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी केले.  
सहकार कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्य़ाला जिल्हा उपनिबंधक हे एक पद व त्यांच्या नावाने कार्यालय असते. महसूल विभागाच्या अधिसूचेनुसार राज्यात ३५ जिल्हे आहेत. गेल्याच वर्षी २६ जून २०१२ रोजी महसूल विभागाने काढलेल्या अधिसूचनेत राज्यातील एकूण जिल्हे व त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित केले आहे. त्यानुसार मुंबईत शहर व उपनगर असे दोन जिल्हे व त्यांच्या भौगोलिक सीमाही स्पष्ट केल्या आहेत. असे असताना सहकार विभागाने मुंबईत दोन ऐवजी चार जिल्हा उपनिबंधकांच्या नियुक्त्या व त्यांच्या नावाने कार्यालये कशी सुरू केली असा प्रश्न निर्माण झाला आहे. सहकार विभागातील काही अधिकाऱ्यांचाच  मुंबईत दोन जिल्हे असताना चार जिल्हा उपनिबंधकांची कार्यालये सुरू करण्यास आक्षेप आहे. याच संदर्भात काही नागरिकांनी मुख्यमंत्री व सहकार विभागाकडे अतिरिक्त दोन जिल्हा उपनिबंधकांची कार्यालये बेकायदा असल्याची लेखी तक्रारही केली आहे.  
मुंबईत शहर व उपनगर जिल्ह्य़ासाठी दोन जिल्हा उपनिबंधक असताना १९९३ मध्ये पश्चिम उपनगरासाठी स्वतंत्र जिल्हा उपनिबंधकाची व त्यांच्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली. वांद्रे ते दहिसर असे त्याचे कार्यक्षेत्र ठरविण्यात आले. त्यात पुन्हा विभाजन करून वांद्रे ते अंधेरी आणि अंधेरी ते दहिसर या विभागासाठी चौथ्या जिल्हा उपनिबंधकाची नेमणूक व कार्यालय स्थापन करण्यात आले. मुळात जिल्हा उपनिबंधक हे पदच जिल्हास्तरीय असताना जिल्ह्याच्या अंतर्गत दोन जिल्हा उपनिबंधकांची कार्यालये कशी, असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.
दुसरे असे की ज्याला सहकार विभाग जिल्हा म्हणते त्याची महसूल विभागाने अधिसूचना काढलेली नाही व त्याचे कार्यक्षेत्रही निश्चित केलेले नाही. त्यामुळे अतिरिक्त दोन जिल्हा उपनिबंधक कार्यालये बेकायदा ठरतात, असा मुद्दा मुख्यमंत्री व सहकार विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.

Story img Loader