लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला वाहनचालक – प्रवाशांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी समृद्धीवरून महिन्याला साडेसात लाख ते नऊ लाख वाहने धावत होती. आता १० लाखांहून अधिक वाहने धावू लागली आहेत. आतापर्यंत समृद्धी महामार्गांवरुन १ कोटी ८५ लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला असून त्या अनुषंगाने पथकराच्या रुपाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) मिळणाऱ्या महसुलातही वाढ होत आहे.
आतापर्यंत १३३८ कोटी रुपये पथकर वसूल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे आता लवकरच समृद्धीवरील वाहनांची संख्या आणि महसूल आणखी वाढणार आहे. लवकरच इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार असून १ एप्रिलपासून पथकर दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे महसुलातही वाढ होणार आहे.
नागपूर ते मुंबई अंतर आठ तासांत पार करता यावे यासाठी एमएसआरडीसीकडून ७०१ किमीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. या महामार्गातील नागपूर ते इगतपुरी असा ६२५ किमीचा महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. इगतपुरी ते आमणे अशा ७६ किमीच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून तो टप्पा येत्या काही दिवसांतच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा टप्पा खुला झाल्यास मुंबई ते नागपूर प्रवास थेट आठ तासांत करता येणार आहे. मुंबई-नागपूर प्रवास अतिजलद करणाऱ्या समृद्धी महामार्गाला सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण आता मात्र या महामार्गाला प्रतिसाद वाढत असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून अर्थात डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ दरम्यान एमएसआरडीसीला पथकरातून ४७६ कोटी रुपये महसूल मिळाला होता. त्यात पुढे मोठी वाढ झाली आणि जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान महसूल थेट ६७५ कोटी रुपयांवर गेला. त्याचवेळी २०२५ मधील पहिल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत समृद्धीवर एमएसआरडीसीने १८७ कोटी रुपये पथकर वसूल केला. वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये समृद्धीवरून ७ लाख ६३ हजार ७६२ वाहने धावली. जानेवारी २०२५ मध्ये वाहनांची संख्या थेट ९ लाख ६७ हजारांवर गेली. तर फेब्रुवारीत वाहन संख्येने विक्रमी उच्चांक गाठल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
कुंभमेळ्याचा हातभार
समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारी २०२५ मध्ये १० लाख ४२ हजार १७१ वाहने धावली. कुंभमेळ्यास जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्याने फेब्रुवारीत वाहनसंख्या आणि पर्यायाने महसूल वाढल्याचेही त्यांनी सांगितले. अपेक्षित वाहनसंख्या, पथकर वसुलीचे उद्दिष्ट अद्याप गाठता येत नसले तरी ही वाहनसंख्या समाधानकारक असून यापुढे वाहनसंख्या आणि पथकर वसूली अधिक वाढेल असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला. १ एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर नवीन पथकर दर लागू होणार आहेत. महिन्याभरात इगतपुरी ते आमणे टप्पाही वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे वाहनसंख्या आणि पथकर वसूली वाढेल, असेही ते म्हणाले.