उद्घाटनाच्या प्रतीक्षेत यंत्रणा

मुंबई : उपनगरातील हृदयविकाराच्या रुग्णांना संजीवनी ठरणारी कूपर इस्पितळातील कॅथ लॅब तयार असूनही उद्घाटनासाठी मुहूर्तच सापडत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे उपनगरातील रुग्णांचे हाल होत असून त्यांना खासगी वा पालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक तसेच परळ येथील केईएम इस्पितळात धाव घ्यावी लागत आहे.

हृदयविकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे उपनगरातही कॅथ लॅबची सुविधा हवी, अशी मागणी भाजप नगरसेविका सुनीता मेहता यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे ऑक्टोबर २०१८ मध्ये केली होती. या हरकतीच्या मुद्द्याला उत्तर देताना पालिकेने कूपर इस्पितळात कॅथ लॅब उभारण्यासाठी लोकमान्य टिळक इस्पितळातील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अजय महाजन यांची समन्वय समिती नेमण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

डॉ. महाजन यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार कूपर इस्पितळात कॅथ लॅब स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. कॅथ लॅब तसेच वैद्यकीय महाविद्यालयाची नवी इमारतही तयार आहे. परंतु करोना काळामुळे उद्घाटन रखडल्याचा दावा केला जात आहे. 

आता उद्घाटन न झाल्याने ही यंत्रणाही धूळ खात पडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा सत्ताधारी शिवसेनेची योजना आहे. त्यास आपला विरोधही नाही. श्रेय घ्या. पण ही सुविधा लवकर उपलब्ध करून द्या. करोनामुळे कार्यक्रम करता येत नसेल तर ऑनलाइन उद्घाटन करा. तसे पत्र

आपण पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल तसेच इस्पितळ प्रशासनाला दिल्याचे स्थानिक नगरसेविका सुनीता मेहता यांनी सांगितले. या बाबत कूपर इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांना विचारले असता, कॅथ लॅबची सुविधा सज्ज असून तसे वरिष्ठांना कळविले आहे. असे सांगितले.

Story img Loader