ठाणे, कळवा, मुंब्रा यासारख्या शहरांमध्ये फोफावणाऱ्या बेकायदा बांधकामांमधील ‘व्होटबॅंके’च्या राजकारणावर स्वतची राजकीय पोळी भाजायची, अनधिकृत झोपडय़ांमधून रहाणाऱ्या रहिवाशांचे पोशिंदा बनायचे आणि मुंब्र्यातील अल्पसंख्याक समाजात ‘मसीहा’च्या थाटात वावरायचे, या ‘आव्हाडपंथी’ राजकारणास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकप्रकारे बक्षीसी दिल्याची चर्चा आता रंगली आहे. पवारांचे मानसपुत्र म्हणून राजकारणात वावरणारे आव्हाड आपल्या बोलबच्चनगिरीमुळे अधिक ओळखले जातात. मात्र, इशरत प्रकरणात आक्रमक भूमिका घेत मुंब्र्यात स्वतचे राजकीय बस्तान बसविणाऱ्या आव्हाडांना अल्पसंख्याक समाजातील चेहरा म्हणून ‘प्रोजेक्ट’ करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीने सुरु केले असून यामुळे पक्षातील अल्पसंख्याक नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर विधान परिषदेचे सदस्य बनलेले आव्हाड यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली आणि मुंब्र्यातील एकगठ्ठा मताधिक्याच्या जोरावर शिवसेनेचे राजण किणे यांचा सुमारे १४ हजार मतांनी पराभव केला. तेव्हापासून ठाण्यात आव्हाडपंथी राजकारणाने भलताच जोर धरला आहे. राज्याच्या विधिमंडळात बेकायदा बांधकामांविरोधात जोरदार भाषणे ठोकायची, प्रत्यक्षात कळवा, मुंब्र्यात उभ्या रहाणाऱ्या अनधिकृत इमल्यांकडे डोळेझाक करत ते पाप प्रशासनाच्या माथी मारायचे, असे धोरण आव्हाडांनी गेल्या काही वर्षांत सतत अवलंबिले आहे. मुंब्र्यातील एका वन जमीनीवर उभ्या राहिलेल्या बेकायदा चाळी तोडावयास गेलेल्या अधिकाऱ्यांना दमबाजीचे केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रहिवाशांच्या बाजूने उभे रहात असल्याचा आव आणत ‘व्होटबॅंके’चे राजकारण करण्यात आपण किती तरबेज आहोत, हे आव्हाडांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. मतपेटी डोळ्यासमोर ठेवून सुरु असलेले हे आव्हाडपथींय राजकारण सुशीक्षीत ठाणेकरांना आणि हाडाच्या शिवसैनिकांना अजिबात मान्य नाही. मात्र, ठाण्यातील शिवसेनेत सध्या सुरु असलेला नाकार्तेपणा आव्हाडांच्या पथ्यावरच पडू लागला आहे. शीळ दुर्घटनेनंतर अडचणीत सापडलेल्या आव्हाडांशी हातमिळवणी करुन एकनाथ शिंदे यांनी स्वतच्या पायावर धोंडा मारुन घेतला. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेला आव्हाड जेरीस आणतात, असे काहीसे चित्र पुढे आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

* शिवसेनेला चपराक
ठाण्यात दहिहंडी, गणेशोत्सवाची शायिनग करत रस्ते, पदपथ अडवायचे, मुंब्र्यात जाऊन मसीहा बनायचे आणि घोडबंदर मार्गावर उभ्या रहात असलेल्या गगनचुंबी विकासात ‘हातभार’ लावत आर्थिक खुंटा मजबूत करणाऱ्या आव्हाडांना मिळालेली ही बक्षीसी म्हणजे ठाण्यातील शिवसेनेच्या नाकर्तेपणाला मात्र एकप्रकारे चपराक असल्याची चर्चाही येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reward to politics of jitendra awhad