लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: सोळा वर्षांपूर्वी हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेअर याने सार्वजनिक कार्यक्रमात चुंबन घेतल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला दोषमुक्त करण्याचा दंडाधिकाऱ्यांच्या निर्णय सत्र न्यायालयाने सोमवारी कायम ठेवला. न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारा अर्ज फेटाळून लावल्याने शिल्पा शेट्टी हिला दिलासा मिळाला आहे.

एड्स जनजागृतीसाठी २००७ मध्ये राजस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रामात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेअर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान, गेअर याने शिल्पाचे सगळ्यांसमोर चुंबन घेतले. त्या प्रकाराबाबत वाद झाला होता. आपल्यासाठीही गेअर याची कृती अनपेक्षित असल्याचे स्पष्टीकरण शिल्पा हिने दिले होते. दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमात अश्लील आणि असभ्य वर्तन केल्याप्रकरणी शिल्पा हिच्यावर जयपूर, अलवर आणि गाझियाबाद येथे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. राजस्थान न्यायालयाने शिल्पा आणि गेअरविरोधात अटक वॉरंटही काढले होते.

त्यानंतर हे प्रकरण राजस्थान न्यायालयाकडून मुंबई दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. विस्तृत सुनावणीनंतर जानेवारी २०२२ मध्ये शिल्पा हिला एका प्रकरणात न्यायालयाने दोषमुक्त केले होते. घटनेची चित्रफित पाहिल्यास गेअर याच्या कृतीची शिल्पा हीच पीडित असल्याचे दिसून येते, असे निरीक्षण तिला प्रकरणातून दोषमुक्त करताना न्यायालयाने नोंदवले होते. तसेच गेअर याने तिचे चुंबन घेतले, त्यावेळी शिल्पा हिने त्याचा प्रतिकार केला नाही. यामुळे तिला गुन्हेगार ठरवता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.

दंडाधिकाऱयांच्या या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. दंडाधिकाऱयांनी शिल्पा हिला दोषमुक्त ठरवण्यात चूक केली. तिला दोषमुक्त ठरवण्याचा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या तत्वाविरोधात आहे. त्यामुळे तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी फेरविचार अर्जाद्वारे करण्यात आली होती. मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. जाधव यांनी हा फेरविचार अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, दंडाधिकाऱयांनी दुसऱ्या प्रकरणात सुनावणी सुरू असल्याने शिल्पा हिला दिलासा देण्यास नकार दिला होता. त्या आदेशाला शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने तिच्याविरोधातील गुन्हा रद्द केला होता.